अभिमानास्पद! 'विधवा प्रथा' बंद करणाऱ्या हेरवाड, माणगाव पंचायतींना सामाजिक पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Herwad Mangaon Gram Panchayat

हेरवाड व माणगावच्या ग्रामसभांनी विधवांची अवहेलना करणाऱ्या प्रथा बंद करण्याचा ठराव केलाय.

'विधवा प्रथा' बंद करणाऱ्या हेरवाड, माणगाव पंचायतींना सामाजिक पुरस्कार जाहीर

सातारा : विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव करणाऱ्या हेरवाड व माणगाव ग्रामपंचायतींना (Mangaon Gram Panchayat) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा सामाजिक प्रेरणा पुरस्कार (Social Motivation Award) जाहीर झाला आहे. याच पार्श्वभूमीवर विधवा प्रथा बंद व्हावी, यासाठी परिपत्रक काढून महाराष्ट्र शासनानं देखील पुरोगामी पाऊल पुढं टाकलंय. हेरवाड (जि. कोल्हापूर) ग्रामपंचायतीनं विधवा प्रथा बंद केल्याच्या ठरावाचं रूपांतर आता शासन परिपत्रकात झालंय. राज्यातील ग्रामपंचायतींनी विधवा प्रथा बंदीसाठी हेरवाडचा आदर्श घेऊन कार्य करावं, असं आवाहन शासनानं केलंय.

याबाबतची माहिती अंनिस राज्य कार्यकारी समितीच्या (Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti) वतीने देण्यात आली. या पुरस्काराचे वितरण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीच्या Ahilyabai Holkar Jayanti (३१ मे) रोजी हेरवाड व माणगाव येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य अध्यक्ष सरोज पाटील व डॉ. शैला दाभोलकर यांच्या हस्ते व अभिनेते किरण माने (Actor Kiran Mane) यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. प्रत्येकी ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

महाराष्ट्रातील समाजसुधारकांनी एकोणिसाव्या व विसाव्या शतकात विधवांशी निगडित अमानुष प्रथा निर्मूलनासाठी केलेल्या विविध प्रयत्नांतून बदलाला चालना मिळाली; परंतु आजही सर्व जाती- धर्मांतील विधवांना विविध प्रथांच्या नावाखाली सन्मान व प्रतिष्ठा नाकारण्यात येते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) हेरवाड (Herwad Gram Panchayat) व त्यानंतर माणगाव या गावांच्या ग्रामसभांनी विधवांची अवहेलना करणाऱ्या प्रथा बंद करण्याचा ठराव केला. ही प्रेरणादायी घटना आहे. त्यामुळे सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्मरणार्थ कमल विचारे यांनी दिलेल्या देणगीतून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती हेरवाड व माणगाव या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सामाजिक प्रेरणा पुरस्कार जाहीर करत आहे, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

सत्यशोधक केशवराव विचारे यांनी वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी सरकारी नोकरी सोडून सत्यशोधक समाजाच्या व सहकार चळवळीच्या कामाला वाहून घेतले होते. महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार वितरण समारंभावेळी विधवांना सन्मान देण्याची अभिनव कल्पना मांडून ती अमलात आणण्याची प्रेरणा देणारे महात्मा फुले सामाजिक सेवा मंडळ संस्थेचे प्रमोद झिंजाडे (रा. करमाळा) यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीचे सदस्य प्रशांत पोतदार, कार्याध्यक्ष हौसराव धुमाळ यांनी केले आहे.

शासनाच्या भूमिकेचे स्वागत

विधवांनी समाजात सन्मान देण्याचा अभिनव कृती कार्यक्रम राज्यभर नेण्याचे राज्य शासनाच्या विचाराधीन आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शासनाच्या या भूमिकेचे स्वागत करते. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीही याबद्दलचा जनसंवाद सुरू करणार असून, सामाजिक बदलाशी संबंधित ठरावाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी वेळोवेळी जे संवाद, चर्चा, प्रबोधन करावे लागते ते काम करण्यासाठीही अंनिस कटिबद्ध आहे, असे अंनिसच्या कार्यकारी समितीच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :KolhapurSatara