Motivation News : वसा समाजसेवेचा

लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गावाकडे सामान्य जीवन व्यतीत करण्याऐवजी समाजसेवा किंवा उपक्रमात सहभागी होणारी असंख्य लष्करी कुटुंब आहेत.
Anjum Rashid Shaikh
Anjum Rashid Shaikhsakal

- अंजुम रशीद शेख, (कसबे वणी, जि.नाशिक)

लष्करी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर गावाकडे सामान्य जीवन व्यतीत करण्याऐवजी समाजसेवा किंवा उपक्रमात सहभागी होणारी असंख्य लष्करी कुटुंब आहेत. यात नाशिक जिल्ह्यातील माजी सैनिक रशीद नजीर शेख यांच्या पत्नी अंजुम रशीद शेख ऊर्फ मीना पठाण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. त्या दहा वर्षांपासून कसबे वणी परिसरात समाजसेवा करत असून गोरगरीब, दिव्यांग, भटक्या विमुक्त समाजातील मुलांसाठी काम करत आहोत. पतीने देशसेवा केली आणि आता पत्नी समाजसेवेत अग्रेसर आहे. त्यांचे कार्य त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊ या.

मी एका सामान्य कुटुंबात जन्मलेली. वडील शिक्षक व आईने शिवणकाम करून आमचं चार भावंडांचा सांभाळ केला. मी थोरली. शिक्षण सुरू असतानाच माझं लग्न एका सैनिक कुटुंबात झालं. रशीद नजीर शेख असे त्यांचे नाव. पती सैनिक असल्याने देशसेवेसाठी बाहेर असायचे. काही काळ सहवास लाभल्यानंतर मुलांना घेऊन जबाबदारी पार पाडली.

सात वर्षानंतर राजस्थानच्या अलवरमध्ये कौटुंबिक वसाहतीत राहण्यासाठी गेलो. मुलाचा नुकताच जन्म झाला होता आणि एक महिन्याचे बाळ घेऊन तिथे स्थायिक झाले. १९९९च्या एप्रिल मे महिन्यात कारगिल युद्ध सुरू झाले. म्हणून ते सीमेवर रवाना झाले. मी अलवरला राहिले. सैनिकाचे जीवन हे देशसेवेसाठी असते, पण सैनिक पत्नीचे जीवन अतिशय संघर्षमय असते. जवान देशासाठी लढत असतात, तर दुसरीकडे पत्नीवर कुटुंबांची जबाबदारी असते.

आई-वडील , मुलं, सर्वांना खूप त्याग करावा लागतो. मुलाचा सांभाळ करताना माझी धांदल उडायची अलवरच्या कॅम्प भागातील सर्व सुविधा बंद केल्या होत्या. सर्व सैनिक सीमेवर होते. बाहेरच्या भाजीवाले, दूधवाले कोणालाही प्रवेश नसायचा. त्याकाळी मोबाईल नव्हते. टीव्हीवर येणाऱ्या बातम्या हेच आमचं साधन होत. एखादा जवान हुतात्मा झाला तर त्याच्या गावाकडे आधी कळवल जात.

त्याची पत्नी, मुलं बदलीच्या ठिकाणी असेल तर घरचे नातेवाईक त्यांना गावाकडे नेण्यासाठी गाडी घेउन येत असत. लष्करी भाग असल्याने बाहेरची गाडी दिसत नसे. अशी एखादी गाडी दिसली तर ती कोणाच्या घरासमोर येतेय हे समजेपर्यंत काळजाचा ठोका चुकायचा. मी कधीही विसरू शकत नाही तो क्षण.... काही महिन्यांनी युद्ध संपलं. सात महिन्यांनी पती घरी आले. जीवनात अनेक चढउतार आले.

१८ वर्ष देशसेवा करून आज वणी दिंडोरी येथे स्थायिक झालो. मुले उच्च शिक्षण घेत आहेत आणि मी समाजसेवेचे व्रत घेत गोरगरीब अपंग,शाळाबाह्य भटके विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम करत आहे. अत्याचारपीडित महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहे. या कार्यात कुटुंब सहकार्य करते आणि अशीच देशसेवा करण्याचा दोघांचा मानस आहे.

सामाजिक कार्य

दहा वर्षापासून समाजकार्य करीत आहे. वणी परिसर आणि दिंडोरी ग्रामीण भागात गोरगरीब, मजुरांची मुले तसेच भटके विमुक्त समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. दिव्यांग व्यक्तींना शासनाच्या योजना, कृत्रिम अवयव मिळवण्यासाठी प्रयत्न केले आणि वेळोवेळी न्याय मागण्यासाठी शासनदरबारी भूमिका मांडली. निराधार वृद्ध लोकांना वैद्यकीय मदत करणे, वृद्धाश्रमात आधार देणे, समुपदेशन करून विभक्त कुटुंबांना एकत्र करणे, लोकांना व्यसनमुक्त करणे, भंगार वेचणारे मुलांना शाळाबाह्य शिक्षणाच्या प्रवाहात आणणे यासारखे कार्य हाती घेतले.

वणी दिंडोरी हा आदिवासी भाग असल्याने जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व छत्री दप्तर आदी उपलब्ध करून दिले. युवती आणि महिलांना स्वसंक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षणाचे देण्याचे उपक्रम राबवत आहे. भविष्यात मतिमंद,अपंग, दृष्टिहीन, अनाथांसाठी निवासी शाळा काढून त्यांना स्वावलंबी करत त्यांना सुजाण नागरिक करण्याचा उद्देश आहे.

महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याबरोबरच अत्याचारमुक्त समाज निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यात भारत सामाजिक कार्यकर्ता गौरव पुरस्कार, समिज्ञा हिरकणी राज्यस्तरिय पुरस्कार, दलित आदिवासी युवा संघर्ष पुरस्कार, कोरोनायोद्ध्या, आदर्श समाजसेवक पुरस्कार याचा उल्लेख करता येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com