Dhairyashil Mohite Patil : मोहिते-पाटील घराण्यापुढे राजकीय अस्तित्वाचा प्रश्न

अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याच्या राजकारणाला अकलूजमध्येच धक्का देण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या हालचालींमुळे संपूर्ण मोहिते-पाटील कुटुंबात अस्वस्थता आहे.
dhairyashil mohite
dhairyashil mohitesakal

- विजय चोरमारे

एकेकाळी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व ठेवणाऱ्या अकलूजच्या मोहिते-पाटील घराण्याच्या राजकारणाला अकलूजमध्येच धक्का देण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या हालचालींमुळे संपूर्ण मोहिते-पाटील कुटुंबात अस्वस्थता आहे. त्यातूनच धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीचा विषय पुढे आला. मात्र कौटुंबिक पातळीवर एकमत न होऊ शकल्यामुळे त्याबाबत निर्णय होऊ शकला नाही.

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून राजकारणात सक्रिय होते. प्रारंभी अकलूज आणि नंतरच्या माळशिरस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. त्यांचा राजकीय वारसा विजयसिंह मोहिते-पाटील यांनी तेवढ्याच समर्थपणे पुढे चालवताना अनेक महत्त्वाची मंत्रिपदे आणि उपमुख्यमंत्रिपद तसेच खासदार म्हणूनही त्यांनी काम केले.

सहकारमहर्षींचे दुसरे एक पुत्र प्रतापसिंह यांनीही राज्यात मंत्रिपद तसेच सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले, सध्या ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. संसदीय राजकारणातील प्रभावाबरोबरच सहकार क्षेत्रावरही मोहिते-पाटलांच्या तीन पिढ्यांचे वर्चस्व राहिले.

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर माळशिरस मतदारसंघ राखीव बनला, त्यामुळे २००९च्या विधानसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांना पंढरपूर मतदारसंघातून लढावे लागले आणि या नव्या मतदारसंघात भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव सहन करावा लागला. दरम्यानच्या काळात माढ्यातून बबनदादा शिंदे, करमाळ्यातून संजयमामा शिंदे हे मोहिते-पाटील यांचे विरोधक प्रबळ बनले होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून आपल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी लढावे, अशी गळ शरद पवार यांनी २०१४ मध्ये घातली आणि त्यांनी ती मान्य करून निवडणूक लढवली आणि विजयीही झाले. राष्ट्रवादीकडून दुखावल्यामुळे मोहिते-पाटील यांनी २०१९मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने तिथून रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव करून निंबाळकर विजयी झाले.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते विजयी झाले. मोहिते-पाटील यांच्या कार्यक्षेत्रात मिळालेल्या मताधिक्क्यामुळेच सातपुते विजयी होऊ शकले. त्यानंतरच खऱ्या अर्थाने मोहिते-पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाला सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे मानले जाते.

माळशिरसचे आधीचे आमदार हणमंत डोळस हे मोहिते-पाटील कुटुंबाचा पूर्ण सन्मान राखून कारभार करीत होते. मात्र २०१९ नंतर खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार राम सातपुते असे दोन्ही लोकप्रतिनिधी मोहिते-पाटील यांच्या विरोधकांना हाताशी धरून कारभार करू लागले. त्यांच्या कार्यक्षेत्रातील म्हाळुंग नगरपंचायतीच्या निवडणुकीत मोहिते-पाटील समर्थकांना भाजपचे ‘एबी फॉर्म’ही मिळू शकले नव्हते, त्यामुळे अपक्ष लढून त्यांनी तिथे भाजपचा पराभव केला होता.

विद्यमान आमदार व खासदार या दोघांनीही मोहिते-पाटील विरोधकांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे श्रेय त्यांना मिळू नये म्हणून तिचे नाव बदलून कृष्णा भीमा पूरनियंत्रण योजना म्हणून ती मंजूर करण्यात आली. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांच्यासोबत बैठका घेतल्या, या बैठकांमध्ये त्यांना एकेक लाखांची आघाडी मिळवून देण्याची ग्वाही देण्यात आली.

सांगोल्यात ६७४ मतांनी निवडून आलेल्या शहाजीबापू पाटील यांनी ४० हजारांची आघाडी देण्याची घोषणा केली. निकालानंतर विजयाचे श्रेय मोहिते-पाटील यांना मिळू नये यासाठी आधीच ही व्यूहरचना करण्यात आली.

सावध पावले

मोहिते-पाटील कुटुंबाने गेली पाच वर्षे मुस्कटदाबी सहन केल्यामुळे यावेळी माघार घेतली तर राजकीय अस्तित्वच संपून जाईल, असा मतप्रवाह मोहिते-पाटील कुटुंबामध्ये बळावत चालला आहे. सुरक्षित कोषात राजकारण करण्याची सवय जडलेले रणजितसिंह मोहिते पाटील हे एकटेच धैर्यशील मोहिते-पाटील यांनी लढू नये, या विचाराचे आहेत. बाकी संपूर्ण मोहिते-पाटील कुटुंबीय लढण्याच्या निर्णयाप्रत आल्याचे सांगण्यात येते.

कुटुंबातील कर्ते मानले जाणारे जयसिंह मोहिते-पाटील यांनी तर धैर्यशील यांनी तुतारीवर लढावे, असा आग्रह जाहीरपणे बोलून दाखवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार हवा आहे आणि मोहिते - पाटलांना पक्ष हवा आहे, असे असले तरी दोन्ही बाजूंनी सावधपणे पावले टाकण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com