राज्यातील 26 महापालिकांना 1 हजार 404 कोटी रुपये

विजयकुमार सोनवणे
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर, उल्हासनगर, अमरावतीला "जीएसटी' अनुदान वाढले

नागपूर, उल्हासनगर, अमरावतीला "जीएसटी' अनुदान वाढले
सोलापूर - महाराष्ट्र वस्तू व सेवाकर प्रणालीच्या मोबदल्यात (जीएसटी) जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये नागपूर, उल्हासनगर व अमरावतीच्या अनुदानात वाढ झाली आहे. राज्यातील 26 महापालिकांना 1 हजार 404 कोटी 9 लाख रुपये मंजूर झाले आहेत. गेल्या महिन्यात ही रक्कम 1 हजार 385 कोटी 27 लाख रुपये होती.

"जीएसटी' लागू झाल्यावर प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत अनुदान देण्याच्या सरकारी निर्णयाची अंमलबजावणी दुसऱ्या महिन्यातही वेळेवर झाली आहे. बुधवारी त्याचा आदेश काढण्यात आला. जुलै महिन्याच्या तुलनेत नागपूर, अमरावती व उल्हासनगरच्या अनुदानात वाढ झाली आहे. जुलैमध्ये नागपूरला 42 कोटी 44 लाख रुपयांचे अनुदान मिळाले होते, ते ऑगस्टमध्ये 60 कोटी 28 लाख रुपये मिळणार आहे. या अनुदानात 17 कोटी 84 लाखांची वाढ झाली आहे. उल्हासनगरच्या अनुदानात 98 लाखांची वाढ होऊन 13 कोटी 83 लाख, तर अमरवतीच्या अनुदानात एक लाखाने वाढ होऊन 7 कोटी 83 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 1 जुलैपासून देशात वस्तू व सेवाकराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे यापूर्वी वसूल करण्यात येणारा प्रवेशकर, स्थानिक संस्थाकर, जकात, उपकर किंवा इतर सर्व कर बंद करण्यात आले आहेत. त्यापोटी हे अनुदान दिले जाणार आहे.

Web Title: solapur maharashtra news 1,404 crore rupess gives to 26 municipal in state