वीजक्षेत्र कंत्राटी वीज कामगारांचा संप स्थगित 

संतोष सिरसट
बुधवार, 7 जून 2017

समान काम समान वेतन, ठेकेदारीवर काम करणाऱ्या कामगाराला कायम करणे, कंत्राटी कामगारांचा सेवाकाल 58 वरून 60 वर्ष करणे, पूर्वग्रह दूषित विचाराने कामावरून कमी करू नये, वितरण व पारेषणमधील रिक्त जागा भरताना कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने हा संप पुकारला होता

सोलापूर - महाराष्ट्र वीजक्षेत्र कंत्राटी कामगार संयुक्त कृती समिती 32 हजार कामगारांचा 22 मे पासून विविध मागण्यांसाठी राज्यभर संप सुरू होता. तो संप त्यांनी स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आजपासून हे सर्व कंत्राटी कामगार कामावर हजर झाले आहेत. 

गेल्या 15 दिवसापासून सुरू असलेला कंत्राटी कामगारांचा संप स्थगित करण्यात आल्यामुळे महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही कंपन्यांमधील कामकाज ठप्प झाले होते. दोन-तीन दिवसापासून पावसाला सुरवात झाली आहे. अशा स्थितीत कामगार संपावर जाणे योग्य नसल्याचे या तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जाणले. त्यामुळे त्यांनी कंत्राटी कामगारांच्या संघटनांशी चर्चा केली. त्या चर्चेनंतर कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत निर्णय घेण्याबाबतही चर्चा झाली. याबाबत काल झालेल्या बैठकीत सकारात्मक तोडगा निघाला नाही. परंतु, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसून या तोडगा काढण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिल्यामुळे हा संप स्थगित करत असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे.

समान काम समान वेतन, ठेकेदारीवर काम करणाऱ्या कामगाराला कायम करणे, कंत्राटी कामगारांचा सेवाकाल 58 वरून 60 वर्ष करणे, पूर्वग्रह दूषित विचाराने कामावरून कमी करू नये, वितरण व पारेषणमधील रिक्त जागा भरताना कंत्राटी कामगारांना सामावून घ्यावे या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेच्यावतीने हा संप पुकारला होता. कामगारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्यामुळे संप स्थगित ठेवण्यात आल्याचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, उपाध्यक्ष अजय माने, सचिव संतोष पवार यांनी सांगितले.

Web Title: solapur news: strike suspended