सोलापूरमध्ये ऊसदाराचा तिढा कायम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 नोव्हेंबर 2017

आंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार

आंदोलनात शेट्टी उतरणार; कारखाने बंद ठेवले तर सांगली, कोल्हापूर, कर्नाटकात ऊस नेणार
सोलापूर - राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, नगर या जिल्ह्यांतील उसाच्या पहिल्या उचलीचा तिढा सुटला आहे, परंतु सोलापूरचा तिढा सुटत नाही. जिल्ह्यातील कारखानदार अडेलतट्टूपणाची भूमिका घेत असल्याने बैठका फक्त चहा पिण्यासाठीच होतात. ऊसदराचे आंदोलन अधिक तीव्र करण्यासाठी स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी बुधवारपासून (ता. 22) सोलापूर जिल्ह्याच्या आंदोलनात उतरणार असल्याची माहिती "स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऊसदराचा तिढा सोडविण्यासाठी बैठकीला आल्यानंतर कारखानदार आडून बसतात. मग बैठक होणार कशी? जिल्ह्यातील कारखानदारांनी कारखाने बंद ठेवण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी कारखाने बंद ठेवले, तर आम्ही शेजारच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील व कर्नाटकातील साखर कारखान्यांना वाजत-गाजत ऊस घालणार असल्याचेही तुपकर यांनी सांगितले. सरकार पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन दडपून टाकत आहे. आपल्याला पोलिसांनी 149 कलमान्वये नोटीस बजावल्याचेही त्यांनी सांगितले. दराच्या बाबतीत सरकार कारखानदार व शेतकरी यांच्यावर जबाबदारी टाकून मोकळे होते मग साखर आयात-निर्यातीचे धोरण, साखरेच्या दराचे नियंत्रण यामध्ये का हस्तक्षेप करतय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काही कारखानदार त्यांचे गुंड पाठवून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पैसे न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा
एफआरपी कायद्यानुसार गाळप झालेल्या उसापोटी शेतकऱ्याला 15 व्या दिवशी उसाचे बिल देणे आवश्‍यक आहे. यंदाचा हंगाम सुरू होऊन 19 दिवस झाले तरीही जिल्ह्यातील एकाही कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले नाहीत. एफआरपीचा कायदा मोडल्याप्रकरणी कारखानदारांना सरकार का नोटीस बजावत नाही, असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: solapur news sugarcane rate issue