

Solapur ZP
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत ६४ वर्षांत पहिल्यांदाच भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपकडून विजयी झालेल्या ३८ सदस्यांमध्ये १५ सदस्य ‘ओबीसी’ आहेत. त्यातील सहा जणांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर असून, त्यात महिला सदस्यास अध्यक्षपदाचा बहुमान मिळू शकतो. आता ओबीसी गटातून विजयी झालेल्या की ज्यांच्याकडे ओबीसी दाखला आहे त्यांना संधी मिळणार, याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे.
सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ३८ सदस्य निवडून आले आहेत. त्यात बालाजी नरुटे (पोखरापूर), माधवी मोरे (उपळाई बुद्रूक), अमृता वाघे (टेंभुर्णी), दीपक वैद्य (उपळाई ठोंगे), भारती दराडे (उपळे दुमाला), रमेश भांजे (संत दामाजीनगर), श्रुती भोरगुंडे (कुंभारी), रामप्पा चिवडशेट्टी (कुंभारी), चैताली मुळे (नान्नज) असे सदस्य ओबीसी प्रवर्गातून विजयी झाले आहेत. तर शांभवी कल्याणशेट्टी (चपळगाव), विमल खताळ (कामती बु.), प्रदीप खांडेकर (भोसे), संगीता दुधाळ (हुलजंती), वंदना कांबळे (मोडनिंब), चेतनसिंह केदार (चोपडी) या नूतन सदस्यांकडेही ओबीसी प्रमाणपत्र असल्याचे बोलले जात आहे. यापैकीच एकाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची संधी मिळणार निश्चित आहे.
आतापर्यंत भाजपला एकदाही जिल्हा परिषदेचा स्वत:चा अध्यक्ष करता आलेला नाही. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील ६५८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका, साडेतीन वर्षांनी होणाऱ्या विधानसभा, त्याआधीच्या लोकसभा निवडणुकीचा विचार करूनच अध्यक्षपदाचे नाव फायनल केले जाणार आहे. त्यासाठी जातीय समीकरणे जुळवून जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि समित्यांचे सभापती निवडले जातील. तत्पूर्वी, जिल्ह्यातील प्रमुख भाजप नेत्यांची मते पालकमंत्री जयकुमार गोरे विचारात घेतील असे सांगण्यात आले आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षपद नाही तर किमान समिती तरी मिळावी, यासाठी अनेकजण फिल्डिंग लावत आहेत.
‘या’ नावांपैकी एकजण फायनल होणाार
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पत्नी शांभवी कल्याणशेट्टी (चपळगाव), बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे कट्टर समर्थक भारती दराडे (उपळे दुमाला) व दीपक वैद्य (उपळाई ठोंगे), माजी आमदार बबनराव शिंदे, संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक शिवाजी कांबळे यांच्या पत्नी वंदना कांबळे, दक्षिण सोलापुरातील आमदार सुभाष देशमुख व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या जवळचे रामप्पा चिवडशेट्टी (वळसंग), मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कट्टर समर्थक विमल खताळ (कामती बु.) यांची नावे अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. अध्यक्षपद न मिळाल्यास यातील काहींना समित्यांच्या सभापतिपदाचीही संधी मिळू शकते. समितीसाठी माजी आमदार राम सातपुते यांची पत्नी संस्कृती सातपुते (दहिगाव), पृथ्वीराज माने यांची नावे चर्चेत आहेत.
लाडकी बहीणच होणार अध्यक्ष!
विधानसभा, महापालिका, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत महिलांनी सर्वाधिक साथ भाजपलाच दिली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी (महिला किंवा पुरुष) राखीव आहे. महिलेच्या हाती मिनी मंत्रालयाची चावी जाईल, असे बोलले जात आहे. पुढील आठवड्यात ग्रामविकास विभागाकडून अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. २८ फेब्रुवारीपूर्वी अध्यक्ष निवडला जाईल, असेही सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.