

maharashtra
sakal
सोलापूर : तब्बल चार वर्षे रखडलेल्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला असून, या जागेवर भाजपचाच उमेदवार निवडून येणार, हे जवळपास निश्चित आहे. जिल्ह्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याने महायुतीचे संख्याबळ प्रचंड मजबूत झाले आहे. त्यामुळे आता भाजपची उमेदवारी नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्सुकता लागली आहे.
२५ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होणार असून, १ जून ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने २०२२ पासून ही निवडणूक प्रलंबित होती. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका आणि अनेक नगरपालिकांवर प्रशासक असल्याने विधान परिषद निवडणूक होऊ शकली नव्हती. डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या मतदारसंघात एकूण सुमारे ५५५ मतदार आहेत. त्यापैकी एकट्या भाजपचे सुमारे ३१३ मतदार असल्याचे मानले जाते. शिवसेनेचे ६६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ मतदार मिळून महायुतीचे एकूण संख्याबळ ४०६ पर्यंत पोचते. म्हणजेच, जवळपास ७४ टक्के मतदार महायुतीकडे असल्याने विरोधकांची स्थिती अत्यंत कमकुवत मानली जात आहे. विजयाच्या निश्चितीमुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी मोठी चुरस आहे.
सोलापूर जिल्ह्याबाहेरील ‘तो’ नेता कोण?
माढा लोकसभा मतदारसंघातील सोलापूर जिल्ह्याबाहेरील एका बड्या नेत्याचे नावही चर्चेत आले होते. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना विचारले असता त्यांनी, बाहेरचा-जिल्ह्यातला असा वाद निर्माण करण्याची गरज नसल्याचे सांगत, अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ऐनवेळी भाजपकडून धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याही नावाची चर्चा आहे.
‘केडर’ऐवजी वेगळी राजकीय गणिते
पक्षाने नुकतेच विधानसभेतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या निवडणुकीत ‘केडर’ला प्राधान्य दिले होते. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक ही वेगळ्या राजकीय गणितावर चालत असल्याने दीर्घकालीन दृष्टिकोनातून पक्षाला अत्यंत सक्षम उमेदवार निवडावा लागणार आहे.
हे आहेत प्रमुख दावेदार...
माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राम सातपुते, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार.
१) माजी आमदार प्रशांत परिचारक
जमेच्या बाजू
२०१६ ते २०२२ या कालावधीत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व
पक्षासाठी विधानसभेच्या दोन निवडणुकांत माघार
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून मनधरणी, विधिमंडळाचा शब्द
कमकुवत बाजू
सैनिकांविषयीचे वादग्रस्त विधान
सहकारी संस्थांतील अपयशाचा ठपका
राजकीय डावपेचातील अपयश
-----
२) माजी आमदार राम सातपुते
जमेच्या बाजू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय
‘अभाविप’मधून पुढे आलेले नेतृत्व
ऐनवेळी लोकसभेच्या मैदानात उडी, मातब्बरांशी लढण्याची क्षमता
नकारात्मक बाजू
संयमाचा अभाव
अनेकदा टोकाची टीका
नुकतेच झेडपीत पत्नीला संधी
----
३) माजी आमदार राजन पाटील
जमेच्या बाजू
लोकसभा मतदारसंघातील एक प्रभावशाली नेता
सहकारासह प्रदीर्घ राजकीय अनुभव
स्थानिक स्वराज्य संस्थांत वर्चस्व
नकारात्मक बाजू
पक्षाबाहेरून आलेली प्रतिमा
अनगरमधील वादामुळे प्रतिमेला धक्का
पुत्रमोह अडचणीचे ठरणार
-----
४) माजी आमदार राजेंद्र राऊत
जमेच्या बाजू
दोनवेळा आमदार
स्थानिक स्वराज्य संस्थांसह सहकारात वर्चस्व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीकता
नकारात्मक बाजू
झेडपीत समर्थकाला अध्यक्षपद
संघटनेऐवजी स्वतंत्र प्रतिमा, आक्रमक स्वभाव
डीसीसीमधील भूमिका निर्णायक ठरणार
-----
5) जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण
जमेच्या बाजू
संघटनेतून आलेले, कामाचा अनुभव व पक्षनिष्ठा
स्थानिक नेतृत्वाची मर्जी
सर्वसामान्य संयमी नेतृत्व
नकारात्मक बाजू
लोकप्रतिनिधींपुढे संघटनशक्ती फिकी
सर्वार्थाने प्रभाव पाडण्याबाबत प्रश्न
बेरजेच्या राजकारणाचा अभाव
मित्रपक्षांचे संख्याबळ
शिवसेना : ६६
राष्ट्रवादी काँग्रेस : २७
एकूण : ९३
महायुतीचे एकूण संख्याबळ : ४०६
(टीप : राष्ट्रवादीत आलेल्या माढ्यातील साठे गटाचे १३ नगरसेवक काँग्रेसकडून निवडून आले आहेत.)
भाजपचे भक्कम संख्याबळ
जिल्हा परिषद : ३८
पंचायत समिती : १०
महापालिका : ८७
नगरपालिका व नगरपंचायत : १७८
एकूण संख्याबळ : ३१३
सोलापुरातील स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय मतदार
महापालिका : १०२
जिल्हा परिषद : ६८
पंचात समिती सभापती : ११
नगरपरिषद-नगरपंचायत : ३७४
एकूण : ५५५
उमेदवारी अर्ज ते मतमोजणीपर्यंतचे वेळापत्रक
१ जूनपर्यंत अर्ज स्वीकृतीची मुदत
अर्ज स्वीकृती सुरवात : २५ मे
अर्ज स्वीकृती मुदत : १ जून
अर्ज छाननी : २ जून
अर्ज माघार मुदत : ४ जून
मतदान : १८ जून
मतदानाची वेळ : सकाळी ८ ते दुपारी ४
मतमोजणी : २२ जून
आचारसंहिता संपणार : २५ जून
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.