esakal | दहावीच्या निकालावेळी तांत्रिक बिघाड; चौकशीसाठी समितीची स्थापना
sakal

बोलून बातमी शोधा

varsha gaikwad

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दहावीचे निकाल जाहीर केले.

दहावीच्या निकालावेळी तांत्रिक बिघाड; चौकशीसाठी समितीची स्थापना

sakal_logo
By
मीनाक्षी गुरव

पुणे - दहावीच्या निकालाची उत्सुकता ताणली असताना अचानक निकालाचे संकेतस्थळ कोलमडले. परिणामी निकाल घोषित केलेल्या वेळेपेक्षा तब्बल सहा-सात तास उशिराने विद्यार्थ्यांच्या हातात पडला. त्यामुळे आता निकालाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडाची सखोल चौकशी आता करण्यात येणार आहे. या परिस्थितीला जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांना समितीमार्फत होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी एक वाजता घोषित करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले होते. परंतु दुपारी एक वाजल्यानंतर संकेतस्थळावर तांत्रिक अडचणींमुळे निकाल पाहण्यात अडचणी येत होत्या. परिणामी राज्यातील १६ लाखांहुन अधिक विद्यार्थी, पालक, शिक्षकांना दहावीचा निकाल वेळेत पाहता आला नाही. त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. दरम्यान निकाल पाहण्यासाठी उत्सुक असणाऱ्या विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. त्यामुळे राज्य मंडळामार्फत दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भात चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली आहे.

शिक्षण आयुक्त विशाल सोंळकी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन कार्यरत असले. यात माहिती व तंत्रज्ञान विभगाचे सचिव, उद्योग उर्जा व कामगार विभागाचे उपसचिव (उद्योग), शालेय शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार हे सदस्य, तर शिक्षण आयुक्त कार्यालयातील उपसंचालक (प्रशासन) हे सदस्य सचिव सहभागी असतील. या प्रकरणाची सखोल चौकशी करून समितीला येत्या १५ दिवसांत राज्य सरकारला अहवाल सादर करावा लागेल, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सह सचिव राजेंद्र पवार यांनी दिले आहेत.

हेही वाचा: 'रिक्षावाल्या काकां'च्या मुलीला मिळाले शंभर टक्के गुण !

अशा प्रकारे होणार चौकशी :

- निकालापूर्वी राज्य मंडळाच्या अध्यक्षांनी सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती की नाही, हे पाहिले जाईल

- निकाल घोषित करण्यासंदर्भात राज्य मंडळातील तांत्रिक सल्लागारांना पूर्वसूचना दिली होती का?

- संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधित कंपनीला निकाल घोषित करण्याबाबत पूर्वसूचना होती का?

- निकाल घोषित करण्यापूर्वी ‘पूर्व तपासणी’ (ट्रायल रन) केले होते का?

- आवश्यक असलेल्या क्षमतेचा सर्व्हर वापरला होता का?

- भविष्यात अशाप्रकारची आपत्कालीन परिस्थिती उद्‌भवू नये म्हणून उपाययोजना सूचित करणे

- संकेतस्थळ कोलमडल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी जबाबदार अधिकारी, कर्मचारी निश्चित करणे

हेही वाचा: अकरावी प्रवेशाच्या ‘सीईटी’साठी सोमवारपासून अर्ज होणार उपलब्ध

‘‘पुढील आठवड्यात प्रत्यक्ष चौकशी सुरू होईल. निकाल लावण्याबाबत तांत्रिक बाबी सांभाळणारे संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून खुलासा मागविण्यात येईल. याशिवाय निकाल जाहीर करण्याआधी पूर्वतयारी कितपत केली होती, फायर वॉल आणि सर्व्हरची क्षमता तपासण्यात येईल.’’- विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त

दहावीच्या निकालातील त्रुटींसंदर्भात चौकशी समिती

‘‘राज्य मंडळामार्फत इयत्ता दहावीचा निकाल घोषित करताना उद्‌भवलेल्या त्रुटींसदर्भात पाच सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला येत्या १५ दिवसांत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.’’ - वर्षा गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री

loading image