
SSC Result: राज्यात १५१ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण; नागपूर विभागात एकही विद्यार्थी नाही
नंदोरी (जि. वर्धा) : राज्यात दहावीच्या निकालात यंदा शतप्रतिशत गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढल्याचे दिसून आले आहे. गत वर्षी १२२ विद्यार्थ्यांना तर यंदा १५१ विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले आहेत. त्यातील १०८ विद्यार्थी एकट्या लातूर विभागातील विद्यार्थी आहेत. त्यामुळे गुणवाढीचा लातूर पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
राज्यात २०२० साली २४२ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. २०२१ साली ९५७ विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले. तर गेल्यावर्षी १२२ विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले. त्यात वाढ होऊन यंदा १५१ विद्यार्थ्यांना शतप्रतिशत गुण मिळाले आहेत. शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे ०५, नागपूर ००, औरंगाबाद २२, मुंबई ६, कोल्हापूर ००, अमरावती ०७, लातूर १०८, कोकण ३, नाशिक ०० अशा एकूण १५१ विद्यार्थ्यांना नऊ विभागीय मंडळामध्ये शतप्रतिशत गुण मिळाले आहेत.
२०२० साली ८३ हजार २६२ विद्यार्थ्यांना ९० टक्यांहून अधिक गुण मिळाले होते. तर २०२१ साली एक लाख चार हजार ६३३ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले. गतवर्षी ८३ हजार ६० विद्यार्थ्यांना तर यंदा केवळ ६६ हजार ५७८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. त्यामुळे एकीकडे शतप्रतिशत गुण घेणारे विद्यार्थी काही प्रमाणात वाढले असले तरी ९० टक्क्यांहून अधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का मोठ्या प्रमाणात घटला आहे.
नागपूर विभागीय मंडळाच्या ४० पैकी १९ तर अमरावती विभागीय मंडळाच्या ३७ पैकी १९ विषयाचा निकाल शतप्रतिशत लागला आहे. अमरावती विभागीय मंडळाचा निकाल ९३.२२ टक्के तर नागपूर विभागीय मंडळाचा निकाल राज्यात सर्वात कमी ९२.०५ टक्के लागला असून नागपूर विभागीय मंडळात एकाही विद्यार्थ्याला शतप्रतिशत गुण मिळविता आले नाही.
विषयनिहाय निकाल टक्केवारी
विषय/ नागपूर विभागीय मंडळ/ अमरावती विभागीय मंडळ
मराठी /९२.५२ टक्के/९३.५० टक्के
हिंदी/९०.०३ टक्के/९३.४० टक्के
इंग्रजी/९३.९१ टक्के/९४.२२ टक्के
गणित/९५.०५ टक्के/९५.९४ टक्के
विज्ञान/९५.३५ टक्के/९६.३९ टक्के
सामाजिक विज्ञान/९६.०४ टक्के/९६.४६ टक्के
राज्यात पैकीच्या पैकी गुण मिळविणारे विभाग निहाय विद्यार्थी
विभाग/ विद्यार्थी संख्या
लातूर १०८
औरंगाबाद २२
अमरावती ०७
मुंबई ०६
पुणे ०५
कोकण ०३
नागपूर ००
कोल्हापूर ००
नाशिक ००