एसटीची 18 टक्के भाडेवाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

मुंबई - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या प्रवासी भाड्यात शनिवारपासून (15 जूनच्या मध्यरात्रीपासून) 18 टक्के वाढ करण्यात येत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सुट्या पैशांवरून होणारे वाद लक्षात घेता यापुढे भाडेआकारणी ही पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही एसटीने घेतला आहे.

मुंबई - एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेच्या प्रवासी भाड्यात शनिवारपासून (15 जूनच्या मध्यरात्रीपासून) 18 टक्के वाढ करण्यात येत असल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. सुट्या पैशांवरून होणारे वाद लक्षात घेता यापुढे भाडेआकारणी ही पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही एसटीने घेतला आहे.

डिझेलचे वाढते दर तसेच एसटी कामगारांना नुकतीच देण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही भाडेवाढ करण्यात येत असल्याचा दावा महामंडळाने केला आहे.

यापुढे तिकिटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. म्हणजे एखाद्या प्रवासाचे तिकीट सात रुपये असेल तर त्याऐवजी पाच रुपये आकारले जातील. आठ रुपये तिकीट असल्यास 10 रुपये भाडे आकारले जाईल. या निर्णयामुळे सुट्ट्या पैशांचा प्रश्‍न सुटून प्रवासी-वाहकांतील वादावादी थांबेल, असे महामंडळाचे म्हणणे आहे.

मोटार वाहन कायदा 1988 नुसार शासनाला भाडेदर ठरवण्याचा अधिकार आहे. शासन निर्णय क्रमांक एचटीसी 1099/451/प्र. क्र 21 परिपत्रक 1 ता. 16 एप्रिल 1999 अन्वये भाडेवाढीचे सूत्र शासनाने मान्य केले आहे. या सुत्रानुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार महामंडळाला देण्यात आले आहेत.

यापूर्वी 31 जुलै व 22 ऑगस्ट 2014 ला दोन टप्प्यांत मिळून एसटीची 13 ते 15 टक्के भाडेवाढ झाली होती.

जीएसटी आणि वेतनवाढ
जीएसटीमुळे टायर व गाड्यांच्या चासीसचे दर वाढले आहेत. वाढता तोटा लक्षात घेऊन एसटीने दोन वर्षांपासून नवीन गाड्या विकत घेण्याचे बंद केले आहे; परंतु अत्यावश्‍यक असलेल्या टायरचा पुरवठा मात्र सुरू आहे. टायरच्या वाढत्या किमतींमुळे तोट्यात भर पडली आहे. यातच वेतनवाढीचा भारही पडणार आहे. 2017 मध्ये 107 टक्के असलेला महागाई भत्ता एप्रिल 2018 मध्ये 136 टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. सध्या एकूण खर्चाच्या 44 टक्‍क्‍यांहून अधिक खर्च वेतनावर होतो.

डिझेल खरेदीदर
- जुलै 2017 : 54.74 रु./लिटर
- एप्रिल 2018 : 63.78 रु./लिटर
- जून 2018 : 70.50 रु./लिटर

- 12 लाख 12 हजार 500 लिटर... एसटीला दररोज लागणारे डिझेल.
- 97 लाख रुपये... जुलै 2017 च्या तुलनेत एप्रिल 2018 मध्ये एसटीला डिझेलसाठी दररोज जास्त मोजावे लागत होते.
- 1 कोटी 70 लाख रुपये... जून 2018 मध्ये डिझेलसाठी जास्त मोजावे लागत आहेत.
- 544 कोटी रुपये... सध्याचा वार्षिक तोटा.
- 1200 कोटी... वार्षिक तोट्यात आता वेतनवाढीची भर.
- 1744 कोटी... एकूण वार्षिक तोट्याचा आकडा.

Web Title: ST 18 percent rent increase