एसटी स्थानकांचा होणार कायापालट

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 11 जानेवारी 2017

राज्यात विमानतळाप्रमाणे 13 ठिकाणी अत्याधुनिक "बस पोर्ट'
मुंबई - राज्यात एसटी बस स्थानकांच्या जागेवर विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक सोई-सुविधा असलेले 13 "बस पोर्ट' बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी नऊ बस पोर्टचा आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे दिली.

राज्यात विमानतळाप्रमाणे 13 ठिकाणी अत्याधुनिक "बस पोर्ट'
मुंबई - राज्यात एसटी बस स्थानकांच्या जागेवर विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक सोई-सुविधा असलेले 13 "बस पोर्ट' बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी नऊ बस पोर्टचा आराखडा तयार झाला आहे, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे दिली.

"बस पोर्ट'च्या आराखड्याचे सादरीकरण रावते यांच्या दालनात झाले. त्या वेळी पत्रकारांना त्यांनी ही माहिती दिली. या वेळी परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम उपस्थित होते. रावते म्हणाले, की राज्यातील बस स्थानकांचा कायापालट करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. बस स्थानकांची अवस्था चांगली नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी सरकारने विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक सोई-सुविधा, व्यापारी संकुल, रेल्वे स्थानकाशी जोडण्यासाठी "स्काय वॉक', व्यापारी संकुल असे "बस पोर्ट' उभारण्याचे ठरवले आहे. सध्याच्या एसटी स्थानकाच्या जागेचा पुरेपूर वापर करून "बस पोर्ट' व व्यापारी संकुलाचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात बोरिवली-नॅन्सी कॉलनी, पनवेल, शिवाजीनगर (पुणे), पुणे नाका बस स्थानक (सोलापूर), नाशिकचे महामार्ग बस स्थानक, औरंगाबादचे मध्यवर्ती बस स्थानक, नांदेडचे मध्यवर्ती बस स्थानक, अकोला मध्यवर्ती बस स्थानक व नागपूरचे मोरभवन बस स्थानक यांचा समावेश आहे. या सर्व "बस पोर्ट'ची रचना समान असेल. खासगी-सार्वजनिक भागीदारीतून त्याची उभारणी करण्यात येणार आहे. त्याची देखभाल व दुरुस्ती "बस पोर्ट' उभारणारी संस्थाच करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

या बस पोर्टच्या कामासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा मागवण्यात येणार आहेत. बस पोर्टचे प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार म्हणून प्रसिद्ध वास्तुविशारद शशी प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनीच बस पोर्टचा आराखडा तयार केला आहे. उर्वरित सांगली, धुळे, जळगाव व कोल्हापूर या चार बस पोर्टचे काम दुसऱ्या टप्प्यात करण्यात येईल, अशी माहिती रावते यांनी दिली.

राज्यातील इतर बस स्थानकेही विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी 40 वास्तुविशारदांची नेमणूक केली आहे. स्थानिक गरजा लक्षात घेऊन या बस स्थानकांचा आराखडा तयार केला जाईल. त्यात "मिनी थिएटर'चाही समावेश करण्यात येणार आहे. रत्नागिरी बस स्थानकाचा आराखडा तयार असल्याचेही रावते यांनी सांगितले.

असा असेल बस पोर्ट
- भविष्यात लागणाऱ्या सुविधांचा वेध घेऊन सर्व 13 ठिकाणी समान आराखडा
- व्यापारी संकुलाचा वेगळा आराखडा
- सोई-सुविधांचे व्यवस्थापन बांधकाम करणाऱ्या कंपनीकडेच
- प्रत्येक "बस पोर्ट'मध्ये सौर पॅनेल व पर्जन्य जल पुनर्भरणाची सोय
- बस येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग; प्रवाशांसाठी स्वतंत्र व्यवस्था
- प्रवाशांसाठी प्रतीक्षा कक्ष. त्यात बसची माहिती देणारे अत्याधुनिक फलक व रेस्टॉरंट
- पनवेलसारख्या ठिकाणी "बस पोर्ट' व रेल्वे स्थानक स्काय वॉकने जोडणार
- स्काय वॉकवरच व्यापारी संकुल. त्याची मालकी एसटी महामंडळाकडे.

Web Title: st bus stop development