एसटीकडून स्वच्छता कंत्राटदारांचे ‘लाड’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

एसटी महामंडळाच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असताना, एसटीच्या नियोजन व पणन उपमहाव्यवस्थापकांनी ‘ब्रिस्क’ कंपनीच्या स्वच्छतेचे थकीत बिल सात दिवसांत अदा करण्याचे आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहे.

मुंबई - एसटी महामंडळाच्या गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचे तीनतेरा वाजले असताना, एसटीच्या नियोजन व पणन उपमहाव्यवस्थापकांनी ‘ब्रिस्क’ कंपनीच्या स्वच्छतेचे थकीत बिल सात दिवसांत अदा करण्याचे आदेश राज्यातील विभाग नियंत्रकांना दिले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एसटीच्या स्वच्छतेसाठी सुमारे साडेचारशे कोटींचे कंत्राट या कंपनीला देण्यता आले आहे. मात्र, अद्याप राज्यातील एकही बस स्थानकावर आयकॉनिक स्वच्छता दिसून येत नसतानाही एसटीकडून कंत्राटदारांचे लाड पुरवले जात आहेत.

राज्यातील ५६७ बस स्थानके व १८ हजार बससोबतच एसटीची विविध स्वच्छतागृहे, एसटीचा रिकामा परिसर आणि कार्यालये हायटेक मशिन वापरून ‘ब्रिस्क’ कंपनीला दैनंदिन धुवायचे आहे. त्यासाठी साडेचारशे कोटी रुपयांचे कंत्राट काढले होते. मात्र, गेल्या दोन वर्षांमध्ये एकही बस स्थानक स्वच्छतेसाठी आयकॉनीक उदाहरण ठरलेले दिसून येत नाही. त्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या बससुद्धा घाणेरड्या दिसून येत आहेत. 

‘सकाळ’ने यापूर्वी ‘स्वच्छतेसाठी साडेचारशे कोटीचा चुराडा’ असे वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतरही एसटीच्या अधिकाऱ्यांकडून ‘ब्रिस्क’ कंपनीच्या कंत्राटदारांची पाठराखण केली जात आहे.

मूळात स्वच्छतेचे कंत्राट केवळ कंत्राटदारांचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठीच काढण्यात आले असून, महामंडळाच्या पैशांची लुट सुरू आहे. एसटीतील स्वच्छता प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी. अन्यथा गरज पडल्यास एसटीच्या विरोधात न्यायालयात धाव घेणार आहे.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, एस. टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक)

ज्या बस स्थानकांवर कंपनीकडून काम केले जात नाही, त्यासाठी दर महिन्याला सदर कंपनीला दंड आकारला जात आहे. त्यानुसार त्यांच्या बिलांमध्ये कपातही केली जात आहे.
- रणजित सिंह देओल, व्यवस्थापकीय संचालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST cleaning contractor issue