एसटीकडे प्रवाशांनी फिरवली पाठ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

मुंबई - प्रवासी आणि उत्पन्न वाढविण्याचे एसटी महामंडळाकडून आटोकाट प्रयत्न केले जात असतानाच एसटीला मात्र मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. आर्थिक वर्ष 2015-16 च्या तुलनेत 2016-17 मध्ये प्रवासी उत्पन्न तब्बल 267 कोटी रुपयांनी कमी झाले असून, उत्पन्न कसे वाढवावे, या विवंचनेत एसटी महामंडळ आहे. 

एसटी महामंडळाच्या ताफ्यात सध्या 18 हजार बस आहेत. वर्षाला 65 लाखांहून अधिक नागरिक एसटीने प्रवास करतात, असा महामंडळाचा दावा आहे. पाच ते सहा वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. जुन्या बस, बेकायदा प्रवासी वाहतूक इत्यादी कारणांमुळे एसटी महामंडळाच्या प्रवासी आणि उत्पन्नवाढीवर परिणाम होत असल्याचे समजते. प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी वायफाय सुविधा, एसी बस ताफ्यात दाखल करतानाच आधुनिक "बस पोर्ट' उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरीही प्रवासी एसटीकडे पाठच फिरवत आहेत, असे उत्पन्नाच्या आकडेवारीवरून दिसते. 

एसटी महामंडळाला 2015-16 मध्ये पाच हजार 484 कोटींचे उत्पन्न प्रवासी वाहतुकीतून मिळाले होते. 2016-17 मध्ये हे उत्पन्न पाच हजार 217 कोटींवर आले. तब्बल 267 कोटींचे उत्पन्न कमी झाले. एप्रिल 2017 सुरू होताच गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत उत्पन्न 26 कोटींनी कमी झाले आहे. 

सोळाशे बस उभ्याच 
विविध कारणांमुळे एसटी महामंडळाच्या राज्यात एक हजार 600 बस उभ्याच आहेत. लांब पल्ल्याच्या मार्गांवरील समांतर असलेल्या फेऱ्या कमी केल्याने तसेच पुरेसे कर्मचारी नसल्याने आणि नादुरुस्त झाल्याने बस चालवता येत नाहीत. दोन वर्षांत एक हजार 900 बस भंगारात काढण्यात आल्या. त्या तुलनेत फारच कमी बस ताफ्यात आल्या. त्यामुळेही एसटीच्या सेवेवर परिणाम झाला.

Web Title: ST Mahamandal Income less