मुद्रांक शुल्कात आठशे कोटींची घट

Stamp duty
Stamp duty

सोलापूर - मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले; मात्र गतवर्षीच्या तुलनेत एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ८३० कोटी रुपयांची घट झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ११ लाख ८७ हजार दस्त नोंदणीतून १४ हजार कोटी रुपये मिळाले असून, मागील वर्षी याच कालावधीत १५ हजार १३० कोटी रुपयांपर्यंत मिळाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.

जमिनी, खुली जागा खरेदी- विक्री, घर खरेदी- विक्रीसह ६३ प्रकारच्या व्यवहारांमधून महसूल विभागाला दरवर्षी सरासरी २१ ते २६ हजार कोटींपर्यंत मुद्रांक शुल्क मिळते. २०१६-१७ मध्ये २१ हजार कोटी, तर २०१७-१८ मध्ये २६ हजार ५३४ कोटींचे मुद्रांक शुल्क मिळाले. नोटाबंदीनंतर त्यामध्ये थोडीशी घट झाली तरीही मागील वर्षी एकूण उद्दिष्टाच्या ११९ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले. यंदा मात्र, महसूल विभागाने २७ हजार कोटींचे उद्दिष्ट देऊनही अद्याप ५० टक्‍केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. 

जागतिक मंदी अन्‌ बॅंकांसमोरील अडचणींमुळे जागा, जमिनी, घरविक्रीत घट झाली असून, वस्तू व सेवा करातील (जीएसटी) हजारो कोटींची घट आणि आता मुद्रांक शुल्कातील घट, यामुळे आगामी काळात सरकारच्या महसुलात मोठी घसरण होईल, अशीही शक्‍यता तज्ज्ञांकडून व्यक्‍त होत आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून मुद्रांक शुल्क घटल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुद्रांक शुल्क कमी होण्याच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्याची स्थिती (आकडे कोटी रुपयांमध्ये)
२७,००० मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट
१३,६०० सहा महिन्यांतील उद्दिष्ट
१४,००० सप्टेंबरपर्यंत वसुली
८०० मागील वर्षीच्या तुलनेत घट

एप्रिल ते मार्च २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी मुद्रांक शुल्कमधून २७ हजार कोटी रुपये मिळावेत, असे उद्दिष्ट आहे. त्यातून आतापर्यंत १४ हजार कोटींपर्यंत वसुली झाली आहे. आता उरलेल्या काळात उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन असून, मागील वर्षी एकूण उद्दिष्टाच्या ११९ टक्‍के वसुली झाली होती. 
- श्‍यामसुंदर पाटील, सहसचिव, महसूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com