Coronavirus : सावधान! आदेशाचे उल्लंघन केल्यास खावी लागणार जेलची हवा

jail
jail

पुणे : शहरात शनिवारी (ता.१४) कोरोना बाधित रुग्ण आढळला नसून, गेल्या 24 तासांत एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या 23 संशयित रुग्णांचे नमूने निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित असलेल्या दहाजणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून, विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

या पत्रकार परिषदेस जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे उपस्थित होते. 

डॉ. म्हैसेकर म्हणाले, कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालय, जलतरण तलाव, जिम, थिएटर आणि नाट्यगृह बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच, साथरोग अधिनियम 1897 नुसार कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कायद्यात एखादी तरतूद नसल्यास जिल्हाधिकारी वेगळे आदेश देऊ शकतात. त्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी ऍक्‍ट 188 नुसार सहा महिन्यांची कैदेची तरतूद आहे. आदेशाचे पालन होते की नाही, यावर आरोग्य अधिकारी देखरेख ठेवतील. 

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार 15 फेब्रुवारीनंतर परदेशातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस विलगीकरण कक्षात तर कमी जोखीम असलेल्या प्रवाशांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. रेल्वे आणि बसस्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांबाबत संबंधित विभागाचे अधिकारी निर्णय घेतील. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले. 

मास्क आणि सॅनिटायझरची जादा दराने विक्री करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे. तर, एकूण 21 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अन्न व औषधी प्रशासन, वजन मापे विभाग, पोलिस आणि महसूल विभागाकडून संयुक्‍त कारवाई करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली. 

शहरातील शॉपिंग मॉल्स बंद सुरूच राहतील; परंतु मॉलमध्ये गर्दी होईल, असे कोणतेही कार्यक्रम घेता येणार नाहीत. याबाबत मॉल्सच्या मालकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. 

एनआयव्हीचा अहवाल : 

तपासण्यात आलेले नमूने : 262 
अहवाल प्राप्त : 253 
निगेटिव्ह : 243 
पॉझिटिव्ह : 10

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com