'यंदाची दिवाळी समाधानाने जाईल'; अंगणवाडी सेविकांना राज्य सरकारकडून 'भाऊबीज'!

Anganwadi_Sevika
Anganwadi_Sevika

पुणे : "भाऊबीजेचे पैसे मंजूर झाले. त्यासाठी पूर्वी मोर्चे काढावे लागत होते. रस्ते झिजवून कंटाळून जायचो. शिमग्याला पैसे मिळायचे. यंदा कोठे जावे लागले नाही. मानधन आणि भाऊबीज व्यवस्थित पदरात पडली. आता दोन-तीन दिवसानंतर सुटी संपली की मंगळवारपर्यंत भाऊबीज खात्यात जमा होईल. ऑक्‍टोबरचे मानधनही दोन दिवसांपूर्वी मिळाले. दिवाळी समाधानाने पार पडेल,'' जुन्नर तालुक्‍यातील पाडळी केंद्रातील अंगणवाडी सेविका संमिद्रा बोराडे 'सकाळ'शी बोलत होत्या. 

राज्य सरकारने यंदाच्या दिवाळीत पाडव्यापूर्वीच दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट दिली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील सुमारे साडेअकरा हजार अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार आहे. 

दरवर्षी अंगणवाडी सेविकांना दोन हजार रुपये भाऊबीज दिली जाते. परंतु त्यासाठी दरवेळेस महाराश्‍ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करावे लागत होते. सरकारने यावर्षी तरी वेळेवर भाऊबीज द्यावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी केली होती. त्याची दखल घेत महिला व बालविकास विभागाने दिवाळीत पाडव्यापूर्वी भाऊबीजेची भेट दिली आहे. त्यासाठी 38 कोटी एक लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.

अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना शालेय पोषण आहार आणि सरकारच्या विविध योजना राबविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. कोरोनाच्या कालावधीत बालके आणि स्तनदा मातांना घरोघरी जाऊन पोषण आहार पोचविण्याची जबाबदारी पार पाडली. स्थलांतरित मजुरांच्या अपत्यांची काळजी घेतली. तसेच, 'माझे कुटुंब-माझी जबाबदारी' या मोहिमेत अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात तब्बल 11 हजार 664 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळीत वेळेवर भाऊबीज मिळाली. त्यामुळे सरकारचे आभार. परंतु राष्ट्रीय मिशन आरोग्य अभियानांतर्गत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण करणाऱ्या आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचरांना यंदाही भाऊबीज मिळाली नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी मात्र तिखटच जाणार आहे. 
- नीलेश दातखिळे, संघटक सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघ

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com