'चला मावळे घेऊन येऊ'; किल्ल्यांच्या चित्र खरेदीसाठी बालगोपाळात रमले खासदार!

MP_Amol_Kolhe
MP_Amol_Kolhe

कोरेगाव भीमा : दिवाळसणात बालगोपाळांच्या आवडीचा कार्यक्रम म्हणजे घराच्या अंगणात ‘किल्ला बनवणे’. लहाणपणीच्या या आठवणी जागवत शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही पुण्याच्या कुंभारवाड्यात जावून मुलांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी मातीची चित्रे घेतली. यावेळी तेथे पालकांसमवेत चित्रे खरेदीसाठी आलेल्या बालगोपाळांना भेटून त्यांच्या बालमनात रुजणाऱ्या 'शिवसंस्कारालाही प्रोत्साहन दिले.

पुण्यात या मातीच्या चित्रे खरेदीच्या निमित्ताने खासदार डॉ. कोल्हे यांना अनेक बालगोपाळ भेटले. त्यांच्याशी मनमोकळा संवादही झाला. यावेळी नकळत त्यांचेही मन बालपणात फेरफटका मारून आलं. आपल्या लहानपणीच्या आठवणी समाजमाध्यमातून व्यक्त करताना डॉ. कोल्हे म्हणाले, ‘दिवाळसणात ‘किल्ला बनवणे’ हा बालगोपाळांचा आणखी एक सोहळा असायचा ! दगड माती आणून घराच्या अंगणात किल्ला बनवायचा आणि किल्ला छान झाला की मग मातीची चित्र आणून देणार, असं आई वडिलांचे म्हणणं असायचं. अगदी किल्ले प्रदर्शनात असतात तसा देखणा किल्ला जरी नाही बनवता आला, परंतु 'छान झालाय. चला मावळे घेऊन येऊ' अशी आईवडलांची शाबासकी नक्की मिळायची. कदाचित एक 'शिवसंस्कार ' बालमनात रुजतो आहे, त्याला प्रोत्साहन असावं.

एकदा किल्ल्यावर आले की मग ते मावळे दिवाळी पुरते उरायचे नाहीत ते वर्षभराचे सवंगडी व्हायचे. अगदी एखादं चित्र तुटलं तर भाताच्या शिताने त्याचं ऑपेरेशन करण्यापासून ते पुन्हा रंगरंगोटी करण्यापर्यंत. पण दर वर्षी त्या संख्येत भर पडली पाहिजे हा हट्ट मात्र कायम असे.

आज माझ्या मुलांनी बनवलेल्या किल्ल्यावर ठेवण्यासाठी मातीची चित्र घेत फिरताना अनेक बालगोपाळ भेटले, पालक भेटले. किती वर्ष उलटली तरी तोच उत्साह, तीच भावना. चित्रांचाही चेहरामोहरा बदलतोय. कुठे बारा बलुतेदार, कुठे संभाजी महाराज तर कुठे फायबरचे वाटावेत एवढे सुबक खरे कपडे चढवलेले मावळे. नकळत मन बालपणात फेरफटका मारून आलं. परतल्यावर समाधान कायम होतं. शिवसंस्कार अजूनही रुजतो आहे. वाढतो आहे. अंगणात, सोसायटीत बांधल्या जाणाऱ्या प्रत्येक किल्ल्यासरशी एक बुरुज बांधला जातो आहे तो म्हणजे शिवसंस्काराचा !’

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com