esakal | ‘MPSCची परीक्षा घेणार, भरतीही होणार’ : उपमुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pawar

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, यासाठी राज्य सरकारने चांगले वकील दिले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापुढे काही बोलता येत नाही.

‘MPSCची परीक्षा घेणार, भरतीही होणार’ : उपमुख्यमंत्री

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘राज्य सेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा घेण्याची राज्य सरकारची तयारी आहे. मात्र, कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षांचे आयोजन करण्यास आयोगाला सांगण्यात आले आहे. तसेच पोलिस, आरोग्य, शिक्षण या खात्यांमधील भरती करण्याची प्रक्रियाही राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. लवकरच त्याचा कार्यक्रम जाहीर होईल,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुक लाईव्हमध्ये शुक्रवारी (ता.११) दिली. (state govt ready to conduct MPSC exam says Deputy CM Ajit Pawar on Facebook Live)

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आयोजित ‘फेसबुक लाईव्ह’मध्ये पवार यांनी मराठा आरक्षण, पुणे- नाशिक लोहमार्ग, पीक कर्ज, घरकुल योजना, पुण्यात समावेशाच्या उंबरठ्यावर असलेली २३ गावे, कष्टकरी- असंघटित वर्गासाठी राज्य सरकारच्या योजना, दिव्यांगांचे लसीकरण, ताम्हिनी घाटातील रस्ता, पुणे- बारामती रेल्वे, विविध महामंडळांना तरतूद आदींबाबत नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. पवार म्हणाले, ‘‘लसींचा सध्या तुटवडा भासत असला तरी, येत्या दोन महिन्यांत तो दूर होईल. ऑगस्टपर्यंत लसीकरण प्रक्रियेला वेग येईल. तसेच शेतकऱ्यांनी नियमित हप्ते भरल्यास त्यांना पीक कर्जात सवलत देण्याचे राज्य सरकारचे धोरण आहे. शासकीय खात्यांतील भरतीसाठी पुरेशी तरतूद केली आहे. मात्र, ओबीसी पदोन्नतीचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. त्यावर २१ जून रोजी सुनावणी आहे. परंतु,भरती प्रक्रिया होणार असून ती सुरू झाली आहे.’’

हेही वाचा: अजितदादांच्या सकारात्मक आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात

मराठा आरक्षणाबाबत पवार म्हणाले, ‘‘मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकावे, यासाठी राज्य सरकारने चांगले वकील दिले होते. प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापुढे काही बोलता येत नाही. राज्य सरकारने काही केले नाही, हा गैरसमज आहे. काही घटक तो जाणीवपूर्वक पसरवित आहेत. आरक्षणाबाबतच तीन दिवसांपूर्वी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेऊन कायद्यात दुरुस्ती करण्याची विनंती केली आहे.’’

ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आदी किनारपट्टीच्या भागात गेल्या दोन वर्षांत पाच वादळांचा तडाखा बसला आहे. त्या भागांसाठी ५ हजार कोटी रुपयांची योजना तयार केली आहे. तेथे केबल आता भूमिगत पद्धतीने टाकल्या जातील. त्यामुळे वादळ आले तरी दिवे जाणार नाही. या भागाच्या बदलासाठी शासकीय योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: चांगली बातमी! आता घरबसल्या मिळणार लर्निंग लायसन

पुण्यातून दर शुक्रवारी फेसबुक लाईव्ह करून नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच कोरोनाची परिस्थिती निवळल्यावर पुण्यात दर शुक्रवारी अथवा शऩिवारी जनता दरबार घेऊन सार्वजनिक प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अजित पवार म्हणाले...

- पुणे-बारामती रेल्वे फलटणपर्यंत नेणार

- २३ गावे पुण्यात समाविष्ट झाल्यावर महापालिका नियमानुसार कर द्यावाच लागेल

- कष्टकरी वर्गांसाठी योजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे

- विविध महामंडळांना येत्या मार्चपूर्वी तरतूद केलेला निधी उपलब्ध करून देणार

- दोन डोस घेतल्यावरही नागरिकांना मास्क वापरावाच लागणार

(Edited by : Ashish N. Kadam)

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.