esakal | अजितदादांच्या सकारात्मक आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

अजितदादांच्या सकारात्मक आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह  घेतले ताब्यात

अजितदादांच्या सकारात्मक आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात

sakal_logo
By
धोंडीबा कुंभार

पिरंगुट : उरवडे (ता. मुळशी) येथील आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर मृतदेह आज ताब्यात घेतले. मृतांच्या नातेवाईकांच्या मुख्य चार मागण्यांवर तोडगा काढण्याचे तातडीने अजित पवार यांनी आदेश दिल्याने आणि नातेवाईकांना शब्द दिल्याने ससून रुग्णालयासमोर मृतदेह ताब्यात न घेण्यासाठी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा: पुणे : महात्मा फुले मंडईत आग

आगीच्या दुर्घटनेत सतरा कामगारांना जीव गमवावा लागला असून त्यात पंधरा महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. नातेवाईकांनी काल जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या केल्या होत्या. प्रत्येक मृतांच्या कुटुंबातील वारसांना पंचवीस लाख रुपये मिळावेत , मुलांच्या आजीवन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी , प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातेवाईकास कायमस्वरुपी नोकरी मिळावी आणि कंपनीला कायद्याचे उल्लंघन करून ज्या अधिकाऱ्यांनी विविध परवानग्या दिल्या त्यांना या प्रकरणात सहआरोपी करावे, आदी चार प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे. या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही , त्यासाठी नातेवाईकांनी ससूनला आंदोलन सुरू केले होते.

हेही वाचा: पिंपरी शहरात हॉकर्स नियोजन काम सुरू; राजेश पाटील यांची माहिती

ससून येथील आंदोलनानंतर मृतांच्या नातेवाईकांनी विधानभवन येथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या. त्यावेळी पोलिस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच अजित पवार यांनी नातेवाईकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन दिले. यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पेलिस अधीक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, खारवडे येथील देवस्थानच्या अध्यक्षा मधुराताई भेलके व नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे, पिंपरी परिसरातील ड्रायव्हिंग स्कूलही सुरू

यावेळी अजित पवार म्हणाले, कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली पाच लाखांची मदत कमी असल्याने कंपनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी , जिल्हा पोलिस अधीक्षक आणि नातेवाईक यांची तातडीने बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढावा व येत्या शनिवारी अथवा मंगळवारी त्याचा अहवाल मला सादर करावा, असा आदेश दिला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले. त्यापैंकी आठ मृतदेहांवर नवी पेठ येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.