साई संस्थानकडून राज्याला बिनव्याजी कर्ज

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

रखडलेल्या निळवंडे धरणासाठी 500 कोटींचा निधी
मुंबई - आर्थिक संकटात सापडलेले फडणवीस सरकार साईबाबांच्या चरणी आले आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज राज्य सरकारला देण्याचा निर्णय शिर्डी साई संस्थानने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

रखडलेल्या निळवंडे धरणासाठी 500 कोटींचा निधी
मुंबई - आर्थिक संकटात सापडलेले फडणवीस सरकार साईबाबांच्या चरणी आले आहे. रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी तब्बल पाचशे कोटींचे बिनव्याजी कर्ज राज्य सरकारला देण्याचा निर्णय शिर्डी साई संस्थानने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी हा निधी वापरला जाणार आहे.

नगर जिल्ह्यातील निळवंडे सिंचन प्रकल्प चाळीस वर्षांपासून रखडले आहे. धरण बांधून पूर्ण असले, तरी निधीअभावी कालव्यांची कामे रखडली आहेत. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने शिर्डी संस्थानकडे कर्जाची मागणी केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या एक फेब्रुवारीला कर्जाच्या मुद्द्यावर बैठक झाली होती. त्याबाबतचा प्रस्ताव शिर्डी संस्थानकडे पाठवण्यात आला होता. या प्रस्तावाला साई संस्थानने शनिवारी (ता. 1) मंजुरी दिली. राज्य सरकारला दोन टप्प्यांत हे कर्ज दिले जाणार आहे. त्यासाठी गोदावरी-मराठवाडा सिंचन विकास महामंडळ आणि साई संस्थान यांच्यात याबाबत करारही करण्यात आला.

रखडलेल्या निळवंडे सिंचन प्रकल्पासाठी 1200 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी शिर्डी संस्थानकडून कर्जरूपात 500 कोटी, तर जलसंपदा विभागाला यासाठी अर्थसंकल्पातून 300 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी आगामी अर्थसंकल्पात 400 कोटींची तरतूद करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत सिंचन प्रकल्पाचा डावा आणि उजवा कलवा बांधून पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या संस्थानाकडून राज्य सरकारने इतके मोठे कर्ज घेण्याची ही पहिलीच वेळ असल्याची माहिती विभागातील अधिकाऱ्याने दिली.

पाण्याचा प्रश्‍न सुटणार
जिल्ह्यातील पाणीटंचाईमुळे साईभक्तांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे निळवंडे सिंचन प्रकल्पाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आहे. अकोला, संगमनेर, राहुरी, कोपरगाव आणि शिर्डी या तालुक्‍यांना आणि इतर गावांना प्रकल्पाचा फायदा होणार आहे, असे संबंधित अधिकाऱ्याने सांगितले. शिर्डी संस्थानने यापूर्वी सरकारी रुग्णालयासाठी 71 कोटींचा निधी दिला होता. मात्र 500 कोटींचे व्याजमुक्त कर्ज देण्याचा निर्णय झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: State Loan by Sai Sansthan