राज्यात कोळशाऐवजी या पुढे अपारंपारीक उर्जेला प्राधान्य 

संतोष सिरसट 
Wednesday, 17 June 2020

घनकचऱ्यापासून वीजनिर्मिती 
पारेषण विरहित सौर ऊर्जेवर आधारित शेती पूरक (व्यक्तीगत लाभार्थी) विविध योजनांचा या धोरणात समावेश करण्यात आला आहे. शहरी घनकचऱ्यापासून वीज निर्मिती व बायो सीएनजी प्रकल्पांचा विकास यावर या बैठकीत विशेष भर देण्यात आला. 

सोलापूर ः राज्यात अपारंपारिक ऊर्जा धोरणाला चालना देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच झाली. या बैठकीत कोळशाऐवजी अपारंपारिक उर्जा स्त्रोतांचा वापर वीजेसाठी करण्यावर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

या बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महाउर्जाचे महासंचालक सुभाष डुंबरे उपस्थित होते. कोळशावर आधारीत वीज उत्पादनाऐवजी सौर वा तत्सम स्वरुपाच्या अपारंपारिक उर्जेला प्राधान्य देण्यात यावे यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला. राज्यात सहवीज निर्मितीचे 2000 मेगावाट क्षमतेचे प्रकल्प आहेत. त्यात आणखी सुमारे 1000 मेगावॉट भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पवन वगळता अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील अन्य ऊर्जा क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

राज्यात पारंपरिक कृषिपंप जोडणीचे हजारो अर्ज प्रलंबित असून शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाचे वाटप करून दिलासा देण्यात येणार आहे. यामुळे कृषीपंपाच्या वीज जोडणीचे प्रलंबित अर्ज निकाली काढता येणार आहेत. 
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक अनुदान अनुसूचित जाती-जमाती, विजा/भज,इमाव, मराठा इत्यादी कंपोनंट मधून करण्यात येणार आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The state prefers unconventional energy to coal