
राज्यात ‘शाळा मानक प्राधिकरण’ स्थापन करण्यासाठी नेमली समिती
पुणे : शाळांचे मानांकन निकष निश्चितीसाठी राज्यात ‘राज्य शाळा मानक प्राधिकरणा’ची स्वतंत्र यंत्रणा स्थापन करण्यात येणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्य स्तरावर राज्य शाळा मानक प्राधिकरण ही यंत्रणा निर्माण करणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारने स्टार्स प्रकल्पांतर्गत तरतूद मंजूर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात विद्याविषयक मानके तयार करण्याची कार्यवाही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार ‘राज्य शाळा मानक प्राधिकरण’ अशी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यासाठी
प्रशासकीय रचना, शाळांचे मानांकन करण्यासाठी निकष निश्चिती, प्राधिकरणाच्या कार्याचा तपशील, मानांकन करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करणे, प्राधिकरणासाठी येणारा खर्च असा तपशील निश्चित होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी ही समिती काम करणार आहे.
पुणे जिल्हा परिषदेने शांतिलाल मुथ्था फाउंडेशनसमवेत अशा प्रकारची मानक विकसित केली आहेत. त्यादृष्टीने पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शाळा मानक प्राधिकरणाची यंत्रणा विकसित करण्यासाठी ही समिती नेमली आहे. या समितीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा प्रतिनिधी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालक यांचा प्रतिनिधी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ हे सदस्य असणार आहेत.
तर समग्र शिक्षा अभियानाचा प्रतिनिधी सदस्य सचिव असणार आहे. या समितीने आपला अहवाल एका महिन्यात राज्य सरकारसमोर सादर करावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव झ. मु. काझी यांनी अध्यादेशाद्वारे दिले आहेत.