राज्यात काही ठिकाणी वादळी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका
पुणे - ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी रविवारी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका बसत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका
पुणे - ऑक्‍टोबरच्या सुरवातीलाच पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी रविवारी वादळी पावसाने दमदार हजेरी लावली. त्याच वेळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मात्र "ऑक्‍टोबर हीट'चा चटका बसत असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले आहे.

पुढील दोन दिवसांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडतील, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यापासून वादळी वाऱ्यांसह पाऊस हजेरी लावत आहे.

सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने दुपारी ढग आणि संध्याकाळपासून मात्र पावसाच्या सरी पडत असल्याचे दृष्य दिसत आहे. पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणात ही स्थिती असतानाच मराठवाडा आणि विदर्भात मात्र कमाल तापमानाच्या पाऱ्यात वाढ झाली आहे. तेथे "ऑक्‍टोबर हीट'चा अनुभव लोक घेत आहेत. जळगावसह बीड, मालेगाव, अकोला, सोलापूर, परभणी, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वाढला असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने टिपले आहे.

कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. या भागात शनिवारपर्यंत (ता. 6) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत असून, त्याची तीव्रता वाढणार आहे. यातच नैऋत्य बंगालच्या उपसागरापासून पूर्वमध्य अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवारपासून (ता. 3) वादळी पाऊस सुरू होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

मॉन्सूनची आणखी माघार शक्‍य
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी परतीच्या प्रवासाला सुरवात केली आहे. पश्‍चिम राजस्थान, कच्छचा काही भाग, उत्तर अरबी समुद्राच्या काही भागांतून मॉन्सून परतला आहे. राजस्थानचा उर्वरित भाग, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि अरबी समुद्राच्या आणखी काही भागांतून येत्या मंगळवारपर्यंत (ता. 2) मॉन्सून माघारी फिरण्याची शक्‍यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

Web Title: Storm Rain Water