दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; मुंबईतही आंदोलन |varsha gaikwad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Students strike
दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; मुंबईतही आंदोलन

दहावी-बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्यासाठी विद्यार्थ्यांचा एल्गार; मुंबईतही आंदोलन

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा (SSC and HSC exam) या ऑनलाईन (online) घेण्याच्या मागणीसाठी आज मुंबईसह राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, आदी शहरात प्रशासनाला कोणतीच कल्पना न देता काही विद्यार्थ्यांनी दहावी बारावीच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी आंदोलन (students strike) करत जोरदार आंदोलन केले. अचानकपणे केलेल्या आंदोलनाचे राज्यभरात पडसाद उमटले.

हेही वाचा: दिवाळे गाव होणार पहिले स्मार्ट व्हिलेज; नवी मुंबईतील गावांचा होणार कायापालट

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील धारावी येथे सर्वात मोठे आंदोलन करण्यात आले, त्याच दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यानी केला. तर अचानक करण्यात आलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी विद्यार्थ्याना पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला, त्यामुळे काही विद्यार्थ्यानी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या तर या आंदोलनात केवळ बोटावर मोजता येतील इतकेच विद्यार्थी होते, आणि इतर शहरातील क्लासेस मधील आणि दहावी बारावीचा संबंध नसलेले विद्यार्थी म्हणून आंदोलनात सहभागी झाले असल्याच्या प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यानी दिल्या आहेत.

तर राज्य शिक्षण मंडळाने राज्यात कोरोना आणि त्याचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने दहावी बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन घेण्याचे नियोजन केलेले असताना त्यासाठी ऑनलाईनची मागणी गैर असल्याच्या प्रतिक्रियाही उमटल्या. चार दिवसांपूर्वी सोशल मीडियावर वायरल झालेल्या एका हिंदुस्थानी भाऊ यांनी जारी केलेल्या व्हिडिओ आणि त्यानंतर त्यावर उमटलेल्या प्रतिक्रियांनंतर हे आंदोलन झाले असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र ठराविक वेळेत आणि कोणतीही माहिती, निवेदन न देता, अचानकपणे हजारो विद्यार्थी एकाच वेळी मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरात जमून आंदोलन केल्याने यामागे मोठे खाजगी क्लासेस वाल्याचे अथवा, सरकार विरोधी संघटनांचे षडयंत्र असल्याच्या प्रतिक्रिया मुख्याध्यापक, अनुदानित शाळा शिक्षक संघटना आणि शिक्षण तज्ञांकडून उमटल्या आहेत.

हेही वाचा: Union Budget 2022 : मुंबईकरांच्या अपेक्षा काय आहेत ? वाचा सविस्तर

दरम्यान, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि विद्ययार्थ्यांची सुरक्षितता हे मुद्दे सरकारच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्याच पार्श्वभूमीवर परीक्षेचा निर्णय हा तज्ञ मंडळींशी चर्चा करून दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता घेतला आहे. त्याचा पुन्हा आढावा घेतला जाणार आहे. त्यात विद्यार्थी हित लक्षात घेतले जाणार आहे. मात्र अशा प्रकारे आंदोलन करणे योग्य नाही. मी आंदोलकर्त्यांसोबत अथवा त्याच्या प्रमुखासोबत चर्चेला तयार आहे. मात्र यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भावना असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑनलाइन परीक्षा केवळ ग्रामीण भागातसुद्धा शक्य नाही. विद्यार्थी आणि पालक यांचा बुद्धिभेद करणाऱ्या अशा चिथावणीखोर कृतींमुळे विद्यार्थ्यांचे खूपच नुकसान होणार आहे. शिक्षणतज्ज्ञ, मुख्याध्यापक महामंडळ आणि प्रसार माध्यमांनी शाळा नियमितपणे सुरू कशा होतील आणि राहतील, तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा योग्य रीतीने होतील, यासाठी प्रयत्नशील असताना अशा प्रकारचे आंदोलन करणे म्हणजे दुर्देव आहे, त्यामुळे दहावी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणे आवश्यक आहे.

-वसंत काळपांडे, शिक्षण तज्ञ

सोशल मीडियावर विद्यार्थ्याना भडकावून त्यांना रस्त्यावर आणणे हे असमर्थनीय आहे. आणि तितकेच धोकादायक आहे. मागील वर्षी पर्याय नव्हता म्हणून परीक्षा झाल्या नाहीत, मात्र त्यामुळे कोरोना बॅच म्हणून शिक्का बसलेल्या मुलांना नाकारणाऱ्या कंपन्यांवर मुलांचे डोके भडकावणारा भाऊ पुढील पाच वर्षात मोर्चा काढेल का? परीक्षा या ऑफलाईन झाल्या पाहिजे.. मात्र अशी चुकीची आंदोलने करून तरुणांना लाठ्या काठ्या गोळ्यांचे बळी करू नका

- हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षण तज्ञ

राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता व राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रे ही ग्रामीण व दुर्गम भागात असल्याने सदर परीक्षा ऑफलाईनच घ्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ राज्य सरकारकडे करणार आहोत. परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजेत, यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांनी तयारी केली आहे.

- प्रा.मुकुंद आंधळकर, समन्वयक, महासंघ

आम्ही मागील वर्षी कोरोना आणि त्याची परिस्थिती गंभीर असल्याने दहावी बारावीच्या सीबीएसई आणि इतर मंडळाच्या परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी केली होती. राज्यात त्यासाठी सरकारला निवेदन देऊन आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती आणि आंदोलन ही केले होते, मात्र आजच्या आंदोलनात काही तरी चुकीचे घडलेले दिसते. आमची संघटना ही परिस्थिती पाहून परीक्षा ऑनलाइन घेण्याची भूमिका ठेवत आहे. मात्र आज जे झाले त्याची सरकारने दखल घ्यावी

- अड. अनुभा सहाय, इंडिया वाईड पेरेंट असोसिएशन

शाळांनी दहावी-बारावीच्या लेखी परीक्षांसाठी योग्य तयारी केली आहे, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थीही तयार आहेत. मात्र अशा प्रकारचे अचानक आंदोलन करुन त्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची‍ मागणी करणे योग्य नाही. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होईल.

- सुधीर घागस, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना

परीक्षा ऑफलाईनच, मंडळाची भूमिका..

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा राज्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता व राज्यातील बहुतांश परीक्षा केंद्रे ही ग्रामीण व दुर्गम भागात असल्याने सदर परीक्षा ऑफलाईनच व घोषित केलेल्या वेळेनुसारच होतील, अशी भूमिका घेत राज्य शिक्षण मंडळाने घेत त्यासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र नुकतेच यात काही बदल करण्याची सूचना आल्याने त्यासाठी मंडळाकडून सरकारला प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर लवकरच सरकारकडून निर्णय घेतला जाणार आहे.

Web Title: Students Strike In Maharashtra Including Mumbai For Ssc And Hsc Online Exam Demand Education Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top