"हो सके तो लौट के आना" म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी खडसेंच्या राजीनाम्यावर व्यक्त केलं मत 

अथर्व महांकाळ 
Wednesday, 21 October 2020

आज खुद्द खडसेंनीच यावर शिक्कमोर्तब केलं आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विशेष शैलीत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

 

नागपूर ; राज्याचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल चर्चा सुरु होती. एकनाथ खडसे भाजपवर नाराज आहेत त्यामुळेच ते भाजपचे कमळ सोडून घड्याळ हातात घालणार अशी माहिती सूत्रांकडून मिळत होती. मात्र आज खुद्द खडसेंनीच यावर शिक्कमोर्तब केलं आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या विशेष शैलीत याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. 

एकनाथ खडसे हे शुक्रवारी म्हणजेच २३ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मात्र याबद्दल बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. 

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार 

हा भाजपसाठी चिंतनाचा विषय 

एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याचं काम केलं. गोर गरीब लोकांना सोबत घेऊन पक्ष वाढवलं. मात्र आज त्यांचे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी आहे. एका मोठ्या नेत्यानं राजीनामा देणं हा नक्कीच पक्षासाठी चिंतनाचा विषय आहे. 

काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात 

एकनाथ खडसे हे संघर्ष करून वर आले आहेत. त्यांनी पक्षाच्या कामात स्वतःला झोकून देऊन काम केलं आहे. मात्र भारतीय जनता पक्षात काम करताना काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन काम करत राहावं लागतं. खडसेंची नाराजी ही चर्चेतून संवादातून सोडवता आली असती. 

"हो सके तो लाट के आना"

एकनाथ खडसे यांनी भाजप सोडून जाऊ नये असं मनापासून वाटत होतं. कारण पक्ष वाढवण्यात त्यांच्याइतकं योगदान कोणाचंच नाही. मात्र आता त्यांनी राष्ट्रवादीची वाट धरली आहे असं मुनगंटीवार म्हणाले. याबरोबर त्यांनी एकनाथ खडसेंना पुन्हा भारतीय जनता पक्षात येण्याचं आवाहन आपल्या शैलीत एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना केलं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sudhir mungantiwar gave reaction on khadse resign