सुएझमध्ये अडकलेल्या जहाजानं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा जीव टांगणीला; मोठ्या नुकसानाची भीती

evergiven
evergiven

नाशिक - जगातील सर्वांत मोठ्या मालवाहतूक जहाजांपैकी पनामाचे एम. व्ही. एव्हरग्रीन जहाज चीनहून नेदरलँडकडे जाताना सुएझ कालव्यात तीन दिवसांपूर्वी सरकून तिरके झाले आहे. त्यामुळे कालव्यातून होणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यात युरोप आणि रशियाकडे निघालेल्या द्राक्षांच्या १ हजार ८०० कंटेनरचा समावेश आहे. द्राक्षांची एकदम भरमसाठ आवक झाल्याने देशांतर्गत भाव किलोला १५ रुपयांनी, तर निर्यातीसाठी ४० रुपयांनी कोसळले आहेत. तसेच महिन्याभरापूर्वीच्या तुलनेत ५ किलोच्या पॅकिंगला १२ डॉलरवरून साडेनऊ डॉलरपर्यंत युरोपच्या बाजारपेठेत घसरले आहेत.

जगातील महत्त्वाचा जलमार्ग असल्याने जागतिक व्यापारावर परिणाम होण्याचा धोका बळावला आहे. सध्याच्या सुएझ कालव्यातील ट्रॅफिक जाम'मध्ये द्राक्षांप्रमाणेच कांद्याच्या ५० कंटेनरचा खोळंबा झाला आहे. त्यात नाशिकहून निघालेल्या लंडनच्या दोन, इटलीच्या एक आणि हॉलंडच्या ४ कंटेनरचा समावेश आहे. मुळातच, ट्रॅफिक जाम'मुळे युरोपसाठी निघालेले एका आठवड्याचे ९०० कंटेनर पोचणार नाहीत. मात्र वाहतूक सुरळीत झाल्यावर एकदम दोन आठवड्याचे द्राक्षांचे १ हजार ८०० कंटेनर पोचणार असल्याने निर्यातदारांमध्ये भावाबद्दलची धाकधूक वाढली आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचा घास हिरावला. गेल्यावर्षीच्या कोरोनाच्या लॉकडाउनमध्ये द्राक्षे बागेत अडकून पडल्याने उशिराची द्राक्षे यंदा नसतील. त्यामुळे एक महिनाभर अगोदर यंदाचा द्राक्ष हंगाम संपलेला असेल. देशांतर्गत द्राक्षांचे गोल आकाराचे वाण ४० रुपये किलो भावाने विकले जात होते. त्यास आता २५ रुपये मिळताहेत. लांब आकाराच्या वाणाच्या द्राक्षांना ५० ते ६० रुपयांऐवजी ३० ते ३५ रुपये किलो भावावर समाधान मानावे लागत आहे. हे कमी काय म्हणून रशियासाठी ३५ रुपये, तर युरोपसाठी ४५ रुपये किलो भावाने द्राक्षांची खरेदी केली जात आहे. निर्यातीच्या द्राक्षांना ८० ते ८५ रुपये किलोचा भाव शेतकऱ्यांना अपेक्षित होता.

द्राक्षांची निर्यात ७ हजार टनाने कमी
२६ मार्च २०२० पर्यंत - ६ हजार ८४२ कंटेनरमधून ९२ हजार ३४२ टनाची निर्यात
२६ मार्च २०२१ पर्यंत - ६ हजार ३६४ कंटेनरमधून ८५ हजार १०५ टनाची निर्यात

यंदाची आतापर्यंतची निर्यात

  • नेदरलँड- ५५ हजार ५०१ टन
  • इंग्लंड- १४ हजार ५८६ टन
  • जर्मनी- ८ हजार २१३ टन
  • फिनलँड- १ हजार ११७ टन

सुएझ कालव्यात अडकलेले जहाज काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जहाज कंपन्यांशी संपर्क साधल्यावर एकूण आठवडाभराचा कालावधी जहाज काढण्यासाठी लागू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. कालव्यात जहाज अडकल्याने आशियातून युरोप आणि अमेरिकेला जहाजातून सुरु असलेली निर्यात खोळंबली आहे. कालव्यात अडकलेल्या जहाजामुळे आफ्रिकेला वळसा घालून पुढील प्रवास शक्य आहे. मात्र अंतराचा विचार करता, जहाज कंपन्या अतिरिक्त खर्च सहन करू शकणार नाहीत.
- विलास शिंदे (अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी)

कांद्याचा भाव एक हजाराच्या आत
‘मार्च एण्ड'मुळे एक आठवडा ते दहा दिवस बाजारपेठा बंद राहणार आहेत. नेमक्या अशा काळात कांद्याच्या आगारातील जिल्ह्यातील कांद्याचे भाव एक हजाराच्या आत आले आहेत. लासलगावमध्ये एका दिवसांमध्ये लाल आणि उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटलला शंभर रुपयांची घसरण झाली. आज इथे लाल कांदा ८५०, तर उन्हाळ कांदा ९०० रुपये क्विंटल या सरासरी भावाने विकला गेला. हीच सर्वसाधारण स्थितीत इतर बाजारात राहिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com