गॅट करारानुसारच साखर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

कोल्हापूर/पुणे - देशात पाकिस्तानामधून सुमारे ६० लाख टन साखर आयात केली असल्याच्या बातम्या पसरल्या असल्या तरी प्रत्यक्षात केवळ तीन हजार टन इतकीच साखर आयात झाली आहे.

कोल्हापूर/पुणे - देशात पाकिस्तानामधून सुमारे ६० लाख टन साखर आयात केली असल्याच्या बातम्या पसरल्या असल्या तरी प्रत्यक्षात केवळ तीन हजार टन इतकीच साखर आयात झाली आहे.

देशात यंदाच्या हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन आणि गेल्या वर्षीचा शिल्लक साठा लक्षात घेता यंदा ३६० लाख टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. त्या तुलनेत पाकिस्तानातून आयात झालेल्या साखरेचे प्रमाण किरकोळ असून, साखरेच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले. गॅट करार स्विकारल्यानंतर आंतराष्ट्रीय बाजारपेठ खुली झाली. यानुसार कोणताही देश कोणत्याही देशाला माल आयात-निर्यात करु शकतो. या बाबी करताना दोन्ही देशातील व्यापारी, संस्था आयात-निर्यात परवडत असेल तरच करतात. यामध्ये देशाच्या राजकीय संबंधाचा फारसा विचार केला जात नाही. हा व्यवहार व्यापारी तत्वावरच होतो. निर्यात वाढविण्यासाठी काही नियम या करारात आहेत. जर एखाद्या देशाला तुम्ही तुमचे उत्पादन निर्यात करणार असाल तर त्या देशाकडूनचा कच्चा माल तुम्ही आयात शुल्क न आकारता आणू शकता, अशी तरतूद आहे.

केंद्र सरकारने साखरेवर शंभर टक्के आयातशुल्क लागू केले असल्याने पाकिस्तानातून साखर आयात व्यवहार्य ठरत नाही, असे सूत्रांनी सांगितले. ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात इतर वस्तू विनाशुल्क आयात करण्याचे सरकारी धोरण आहे. त्याचा फायदा उठवत एका खासगी कंपनीने चॉकलेट निर्यात करण्याच्या बदल्यात त्या चॉकलेटमधील साखरेच्या प्रमाणाइतकी साखर आयात केली आहे. या आयातीवर शुल्क लागू होत नाही. हे प्रमाण किरकोळ असून, मोठ्या प्रमाणावर साखर आयात होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या (इस्मा)नुसार यंदा देशात विक्रमी ३२० लाख टन साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात १०५ लाख टनांपेक्षा अधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. देशात गेल्या वर्षीचा साखरेचा शिल्लक साठा ४० लाख टन आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात सुमारे ३६० लाख टन साखरेची उपलब्धता राहणार आहे.

आणखी साखर येण्याची शक्‍यता
दिल्लीतील साखर तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या थोड्या प्रमाणात साखर आयात झालेली आहे; परंतु करार जास्त साखरेचा असण्याची शक्‍यता आहे. यामुळे साखरेचा आणखी लॉट कोलकाता बंदरावर येऊ शकतो. 

Web Title: Sugar can be done as per the GAAT agreement