साखर आयुक्तांच्या बडग्यानंतर २१ कारखान्यांकडून एफआरपी रक्कम जमा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर आयुक्तांच्या बडग्यानंतर २१ कारखान्यांकडून एफआरपी रक्कम जमा

साखर आयुक्तांच्या बडग्यानंतर २१ कारखान्यांकडून एफआरपी रक्कम जमा

पुणे : एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांविरुद्ध साखर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर राज्यातील ४३ पैकी २१ कारखान्यांनी सुमारे ९० कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली आहे. तथापि एफआरपी न दिल्यामुळे उर्वरित २२ साखर कारखान्यांना अद्याप गाळप परवाना मिळालेला नाही.

हेही वाचा: 'काशी-मथुरा बाकी है!' मथुरेतील मशिदीत बसवणार श्रीकृष्णाची मुर्ती; हिंदू महासभेची धमकी

राज्यात यंदा १५ ऑक्टोबरला गाळप हंगाम सुरू झाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ४३ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची तीनशे कोटींहून अधिक रक्कम थकीत होती. साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ऊस उत्पादकांची एफआरपी थकविणाऱ्या काही कारखान्यांविरुद्ध महसूली प्रमाणपत्र जप्तीची (आरआरसी) कारवाई केली. तसेच, मागील हंगामातील एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना गाळप परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २१ कारखान्यांनी एफआरपीपोटी ९० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. या कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला आहे.

उर्वरित २२ कारखान्यांकडे अद्याप २३७ कोटींची एफआरपी थकीत आहे. त्यामध्ये सर्वाधिक ५५ कोटी ९१ लाख रुपये किसनवीर भुईंज कारखान्याकडे थकीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शंकर कारखान्याकडे ३० कोटी ७६ लाख रुपये, नगर जिल्ह्यातील साईकृपा-२ कारखान्याकडे २७ कोटी, डॉ. बा. बा. तनपुरे कारखान्याकडे १४ कोटी ६७ लाख, नांदेडच्या टोकाई ससाकाकडे १० कोटी, खंडाळा तालुका किसनवीर कारखान्याकडे १७ कोटी, इंदापूर कारखान्याकडे साडेबारा कोटी, इंद्रेश्वर शुगरकडे १० कोटी ६५ लाख रुपये, यशवंत खानापूर कारखान्याकडे सुमारे ९ कोटी रुपये थकीत आहेत.

हेही वाचा: IND vs NZ : रोमहर्षक सामन्यात टीम इंडियाची विजयी सलामी

एफआरपी थकीत असलेले कारखाने

  • नगर : साईकृपा-२ कारखाना, डॉ. बा. बा. तनपुरे कारखाना.

  • औरंगाबाद : वैद्यनाथ साखर कारखाना, सिद्धेश्वर कारखाना.

  • जालना : रामेश्वर. बीड : अंबाजोगाई.

  • सांगली : एसजीझेड तासगाव सांगली, यशवंत खानापूर,

  • कोल्हापूर : विश्वास, नांदेड : टोकाई ससाका, पन्नगेश्वर, साईबाबा, कुंटुरकर शुगर (जय अंबिका),

  • पुणे : किसनवीर भुईंज, खंडाळा तालुका (किसनवीर), इंदापूर.

  • सोलापूर : शंकर, श्री संत दामाजी, इंद्रेश्वर शुगर, मकाई, मातोश्री लक्ष्मी शुगर अक्कलकोट, आयन मल्टिट्रेड (बाणगंगा ससाका भूम).

"एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांना साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे. एफआरपी थकविलेल्या २१ कारखान्यांनी सुमारे ९० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. उर्वरित २२ कारखान्यांनी एफआरपी दिल्यानंतरच त्यांना गाळप परवाना देण्यात येईल."

- साखर गायकवाड, साखर आयुक्त

loading image
go to top