उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांची गैरसोय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत.

एसटीच्या 8787 बस लोकसभा निवडणूक सेवेत 
मुंबई - एसटी महामंडळाच्या ताफ्यातील एकूण 18 हजारांपैकी 8787 बसगाड्या लोकसभा निवडणुकीच्या कामांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुटीत प्रवाशांचे हाल होणार आहेत. 

सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एसटीला ग्रामीण भागात पसंती असते. त्यामुळे लग्नकार्याला जाण्यासाठी एसटीचाच वापर केला जातो. त्यामुळे मार्च ते जून या लग्नसराईच्या चार महिन्यांत एसटीला मोठ्या प्रमाणात कमाई होते. त्यासाठी दरवर्षी नियोजन केले जाते. या वर्षी उन्हाळ्याच्या सुटीतच लोकसभा निवडणूक असल्याने राज्य सरकारच्या आदेशावरून एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 18 हजारांपैकी 8787 म्हणजे निम्म्या बसगाड्या राखून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सामान्य प्रवाशांची चांगलीच गैरसोय होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीतील राज्यातील मतदानाचा पहिला टप्पा गुरुवारी पार पडला. पुढील तीन टप्प्यांतील मतदान 18, 23 आणि 29 एप्रिलला होईल. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदानाच्या आदल्या दिवशी मतदान केंद्रावर पोचविणे, दुसऱ्या दिवशी मतदानाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी परत आणण्याची जबाबदारी एसटीवर आहे. एसटी बसमधून मतपेट्यांची वाहतूक केली जाणार आहे. एसटी महामंडळाचे मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती असे सहा विभाग आहेत. प्रत्येक विभागातील जिल्हाधिकाऱ्यांनी बसगाड्या आरक्षित केल्या आहेत. 

निवडणुकीसाठी आरक्षित एसटी बसगाड्या - 
मुंबई - 299, पालघर - 159, रायगड - 288, रत्नागिरी - 206, सिंधुदुर्ग - 120, ठाणे - 216, नगर - 409, धुळे - 324, जळगाव - 434, नाशिक - 494, कोल्हापूर - 437, पुणे - 573, सांगली - 367, सातारा - 432, सोलापूर - 584, औरंगाबाद - 341, बीड - 253, जालना - 154, लातूर - 174, नांदेड - 239, उस्मानाबाद - 172, परभणी - 208, अमरावती - 72, अकोला - 312, यवतमाळ - 249, बुलडाणा - 257, भंडारा - 243, नागपूर - 254, गडचिरोली - 204, वर्धा - 143, चंद्रपूर - 170. एकूण - 8787.

Web Title: Summer ST Passenger Inconvenience Loksabha Election