राज्यभर होरपळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 एप्रिल 2018

चंद्रपूर 46 अंशांवर
पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी पुन्हा होरपळत आहे. चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्‍वर, सातारा आणि कोल्हापूर वगळता राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे.

चंद्रपूर 46 अंशांवर
पुणे - पूर्वमोसमी पावसाच्या शिडकाव्यानंतर महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यांनी पुन्हा होरपळत आहे. चंद्रपूरमध्ये सलग तिसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील पुणे, महाबळेश्‍वर, सातारा आणि कोल्हापूर वगळता राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमानाच्या पाऱ्याने सरासरी ओलांडली आहे.

दरम्यान, विदर्भात उष्णतेची लाट असून, पुढील चार दिवस ही लाट कायम राहील, असा इशारा हवामान खात्यातर्फे शुक्रवारी देण्यात आला.

मार्चच्या शेवटी राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाली होती. त्यानंतर राज्याच्या बहुतांश भागात पूर्वमोसमी पाऊस पडला. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षाही खाली गेला होता. या वातावरणाचा प्रभाव ओसरल्यानंतर एप्रिलच्या मध्यावधीमध्ये पुन्हा उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. विदर्भात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मध्य महाराष्ट्रातील जळगाव, मालेगाव, सांगली, सातारा, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड येथे कमाल तापमानाचा पारा वाढला आहे.

राज्यात येत्या सोमवारपर्यंत (ता. 23) हवामान मुख्यत: कोरडे राहणार असून, तापमानातील वाढही कायम राहण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. तर मंगळवारी (ता. 24) विदर्भ मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज आहे.

गुरुवारी सकाळी ते शुक्रवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये जगातील सर्वांत उष्ण ठिकाणांमध्ये चंद्रपूर पहिल्या क्रमांकावर होते. पहिल्या दहा ठिकाणांमध्ये चंद्रपूरसह विदर्भातील गोंदिया, अकोला, वर्धा, मराठवाड्यातील परभणीचा समावेश असल्याचे अलडोरॅडो वेदर या संकेतस्थळाने स्पष्ट केले आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी चंद्रपूरमध्ये देशातील सर्वोच्च तापमान नोंदले गेले, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली.

पुण्यात पारा उतरला
शहरात अवघ्या चोवीस तासांमध्ये कमाल तापमानाचा पारा 2.9 अंश सेल्सिअसने उतरला. गुरुवारी 39.7 अंश सेल्सिअसपर्यंत म्हणजे सरासरीपेक्षा 1.9 अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेला पारा शुक्रवारी संध्याकाळपर्यंत 36.8 (सरासरीपेक्षा एक अंश सेल्सिअसने कमी) अंश सेल्सिअस नोंदला गेला.

चाळिशी ओलांडलेली राज्यातील शहरे
(सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये)

चंद्रपूर - 45.9
ब्रह्मपुरी - 44.8
नागपूर - 44.2
वर्धा - 44
परभणी - 43
अकोला - 42.6
यवतमाळ - 42.5
जळगाव - 42
गोंदिया - 42
अमरावती - 41.8
मालेगाव - 41.4
सोलापूर - 40.7
सांगली - 40.4
नगर  -40.2
सातारा - 40.1
(स्रोत - भारतीय हवामान खाते)

Web Title: summer temperature