उष्णतेच्या लाटेचा पुन्हा इशारा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला.

पुणे - विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिल्याने नागरिकांनी दुपारी उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे. राज्यात ब्रह्मपुरी येथे 46.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुण्यात कमाल तापमानाचा पारा 38.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला.

राज्यात या वर्षी पूर्वमोसमी (वळवाच्या) पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे हवामान कोरडे आहे. त्याचा थेट परिणाम कमाल तापमानवाढीवर होत आहे. राज्यातील बहुतांश भागात कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. गेल्या आठवड्यापासून सातत्याने महाराष्ट्र उष्णतेच्या लाटेत होरपळून निघत आहे. कमाल तापमान वाढल्यानंतर स्थानिक वातावरणात ढग दाटून वळवाचा पाऊस पडतो. त्यातून कमाल तापमानाचा वाढलेला पारा खाली येतो. या वर्षी मात्र आतापर्यंत पूर्वमोसमी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने उन्हाचा चटका वाढला आहे, असे निरीक्षण हवामान तज्ज्ञांनी नोंदविले.

विदर्भात पारा अनेक ठिकाणी; तर मराठवाड्यातील परभणी येथे पारा सातत्याने 44 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवला जात आहे. मध्य महाराष्ट्राच्या तापमानात गेल्या दोन-तीन दिवसांत घट दिसून आली. राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज असून विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारा कायम आहे.

मॉन्सूनमध्ये प्रगती नाही
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याने (मॉन्सून) शनिवारी (ता. 25) निकोबार बेटांचा संपूर्ण भाग व्यापून उत्तर अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत प्रगती केली. मॉन्सूनच्या वाटचालीची सोमवारपर्यंत कोणतीही प्रगती झाली नव्हती, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. येत्या गुरुवारपर्यंत (ता. 30) मॉन्सूनची आगेकूच होण्यास पोषक हवामान असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये, कंसात सरासरीपेक्षा वाढ)
पुणे 38.9 (3), लोहगाव 39.9 (3.9), जळगाव 43.2 (1), कोल्हापूर 38.2 (3.4), महाबळेश्वर 33.1 (4.6), मालेगाव 42.2 (2.9), नाशिक 38.1 (1.1), सांगली 39.6 (3.4), सातारा 40.8 (5.8), सोलापूर 43 (3.5), अलिबाग 36.9 (3.6), डहाणू 35.1 (0.8), सांताक्रूझ 34.2 (0.7), रत्नागिरी 34 (1.2), औरंगाबाद 42 (3.2), बीड 44 (4.4), अकोला 45.3 (3.6.), अमरावती 45 (3), बुलडाणा 41.5 (3.8), बह्मपुरी 46.7 (3.9), चंद्रपूर 46.4 (3.1), गोंदिया 44.8 (2), नागपूर 46.7 (3.9), वाशीम 43.8, वर्धा 46.5 (3.9), यवतमाळ 45 (3.5).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Summer Temperature Increase Heat