मतदान यंत्राचं नंतर बघा; आधी मनोवृत्ती बदला

सुनील माळी
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेला प्रचार अजिबात प्रभावी नव्हता. एवढंच नव्हे तर त्यातून पराभूत मनोवृत्तीच दिसत होती. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड यशानं काँग्रेसनं आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलाच धसका घेतला होता.

यंत्रांमधील घोळाबाबत तक्रार करणाऱ्या अन पक्षातल्याच लोकांनी विरोधी प्रचार केल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनो आणि पक्षनेत्यांनो... आता तरी जागे व्हा. आपला पराभव नक्की कशामुळे झाला, हे समजण्यास तुम्हाला जितका उशीर लागेल, जितके उशिरा तुम्ही भानावर याल. तितका जादा वेळ तुम्हाला पुन्हा विजयी व्हायला लागेल...

ईव्हीएम यंत्रांत अजिबात दोष नव्हता, असे मी म्हणत नाही किंवा ती यंत्रणा खूपच चांगली असल्याची भलावणही करत नाही. या यंत्रणेत दोष असतील तर तुम्ही जरूर आवाज उठवा, पण केवळ मतदान यंत्रांतील दोषांमुळेच आपला पराभव झाला, अशी स्वतःची (खोटी) समजूत तुम्ही करून घेतली असेल तर तुम्ही सत्यापासून दूर पळत आहात किंवा उजाडले तरी वाळूत मान खुपसण्याचा शहामृगी पवित्रा तुम्ही घेतलेला असेल. 

काही मुद्दे तुम्ही चर्चेसाठी किंवा वादासाठीही खुले ठेवा.

पहिला मुद्दा...लक्षात घ्या...इतिहासात अनेक लाटा आलेल्या (आणि गेलेल्याही) आहेत. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणिबाणीविरोधात 1977 मध्ये आलेली जनता लाट या देशाने पाहिली. त्यानंतर अवघ्या दोन-तीन वर्षांत म्हणजे 1980 मध्ये पुन्हा इंदिरा लाट आली. 1984 मधील इंदिरा हत्येनंतर काँग्रेस लाट उसळली आणि त्यामुळंच त्यानंतर अस्तित्त्वात आलेल्या लोकसभेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी 'लोकसभा नव्हे शोकसभा' असे म्हटलं. मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीनंतर 2014 मध्ये नरेंद्र मोदी नामक लाट आली आणि त्याच वर्षी आलेल्या विधानसभा निवडणुकीतही तिनं महाराष्ट्राची सत्ताही भाजपच्या गळ्यात घातली. त्या निवडणुकांना दोन वर्षे झाल्यानंतर नुकत्याच पार पडल्या त्या दहा महापालिकांमधील आणि पंचवीस जिल्हा परिषदांमधील निवडणुका. या निवडणुकांमध्येही भाजपला घवघवीत यश मिळाल्यानं 2014 ची मोदी लाट अजून विरलेली नसल्याचंच स्पष्ट झालं. त्यामुळं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे परापंरागत बालेकिल्ले पार वाहून जाण्यास ही लाट प्रामुख्यानं कारणीभूत आहे, कुठलंही मतदान यंत्र नव्हे. 

दुसरा मुद्दा. पुण्यातील निवडणुका तब्बल चार सदस्यांच्या प्रभाग पद्धतीने झाल्या आणि प्रत्येक वॉर्ड म्हणजेच प्रभागातील मतदारसंख्या तब्बल 80 हजारांपर्यंतची होती. म्हणजेच एकेका प्रभागाला मिनी विधानसभाच म्हटलं गेलं. परिणामी ही निवडणूक व्यक्तिकेंद्रित राहणंच शक्‍य नव्हतं, कारण एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांवर एका व्यक्तीने नगरसेवकपदासाठी प्रभाव टाकणं ही अवघड बाब होती. त्यामुळे ती निवडणूक पक्ष म्हणूनच लढवली जाणार होती. तशी ती लढली गेल्यानं आणि इतर पक्षांपेक्षा सध्या भाजपचाच प्रभाव असल्यानं त्या पक्षाची सरशी होणार होती. तशी ती झालीही. एका प्रभागातील चारपैकी चारही जागांवर केवळ भाजपच निवडून आला, असे तब्बल पंधरा प्रभाग होते. या प्रभागातील मतदारांनी उमेदवार नव्हे तर पक्षच 'चालवला'. म्हणूनच या प्रभागांतील तब्बल साठ सदस्य पक्षनिहाय मतदानाने निवडून आले. (भाजपच्या एकूण विजयी उमेदवारांची संख्या आहे 98) 

तिसरा मुद्दा. तुम्ही म्हणजे तुमच्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेला प्रचार अजिबात प्रभावी नव्हता. एवढंच नव्हे तर त्यातून पराभूत मनोवृत्तीच दिसत होती. लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड यशानं तुमच्या काँग्रेसनं आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनंही चांगलाच धसका घेतला होता. तुमचे दोन्ही पक्ष चांगलेच हबकले होते. जणू काही भाजप सत्तेवर आलाच, अशी खात्री भाजपपेक्षा तुम्हालाच अधिक वाटत होती. राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या प्रचारातील मुख्य मुद्दा त्यांनी गेल्या दहा वर्षांत पुणे महापालिकेत केलेलं बरेवाईट काम हे नव्हतंच. त्यांचा मुख्य मुद्दा होता तो भाजपनं बाहेरून आणलेल्या आयारामांना आणि त्यातही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना दिलेली उमेदवारीची संधी. अनेकांना 'तत्त्वनिष्ठ भाजप असे का वागतो आहे', असा प्रश्‍न पडला. त्या पक्षाच्या भवितव्याची काळजीही ते व्यक्त करत होते तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत चिंता वाटत होती. 'संघाच्या आतापर्यंतच्या तपश्‍चर्येचं हेच फळ का', असा प्रश्‍न त्यांनी विचारला. 'भाजप बिघडला रे बिघडला' अशी आरोळी तुमच्या या दोन्ही पक्षांनी ठोकली. मतदारांनी मात्र 'तुम्ही आतापर्यंत काय करत होतात ? तेच करत होतात,' अशीच विचारणा तुम्हाला केली. 'गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचे उमेदवार यापूर्वी तुमच्याच पक्षात होते ना' असा सवालही मतदारांनी तुम्हाला केला. म्हणजेच गुन्हेगारी पार्श्‍वभूमीबाबत तुम्हाला बोलायचा काहीच अधिकार नाही, असेच मतदार तुम्हाला सुनावत होते. अर्थात, त्यांचे ऐकण्याच्या मनस्थितीत तुम्ही किंवा तुमचे पक्ष नव्हतेच. त्यांच्या टीकेनं भाजपचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या प्रचारच होत होता. 

चौथा मुद्दा...भाजपलाच विजयी करायचं, ही खूणगाठ मतदारांनी मनाशी बांधली होती आणि त्यामुळेच शहरातील सर्व भागांतून कमळ फुललं... हे झालं भाजप आणि त्यांच्या विजयी वीरांबाबत... आता तुमची जबाबदारी काय, हा आहे माझा चौथा मुद्दा. 

भाजपला आता विजय मिळाला आणि लोकांनी त्याला मतं दिली, हे मोकळेपणानं मान्य करून पुन्हा तुम्ही राजकारणाला आणि समाजकारणाला भिडायचं. लोकांचे प्रश्‍न-समस्या घेऊन पुन्हा लोकांमध्ये जायचं, त्यांचा विश्‍वास संपादन करायचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा, पाच वर्षे सकस-निरोगी-विधायक अशा विरोधकाची भूमिका पार पाडायची. मग पाच वर्षांनी लोकांच्या समस्या घेऊन लोकांतूनच उभं राहायचं आणि विजयी व्हायचं. 'लोकांत आणखी काम करा', असा जनादेश तुम्हाला मिळाला आहे. ते करायचं सोडून तुम्ही डोळ्यांवर कातडं का पांघरता आहात ? 'यंत्रं मॅनेज झाली, त्यामुळं आम्ही पडलो', 'पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या प्रभागात विरोधी काम केलं,' 'तिकिटंच चुकीची दिली,' 'ऐन प्रचार सोडून नेते त्यांच्या गावालाच निघून गेले,' 'पार्टीनं पैसाचं सोडला नाही', ही तुमची वक्तव्यं तुम्ही अजूनही खोट्या विश्‍वात किंवा मूर्खांच्या नंदनवनात आहात, हेच दाखवतात. लोकांचे प्रश्‍न घेऊन उतरण्याची तुमची सवय सुटली आहे, प्रदीर्घ काळच्या सत्तेने येणारी सुस्ती तुम्हाला आली आहे. लोकांत जाऊन आंदोलन करायचे म्हणजे 'बालगंधर्व'समोरच्या चौकात फोटोपुरता फलक हाती घ्यायचा आणि फोटो काढला की गायब व्हायचे, अशीच समजूत आपली झाली आहे. 

...म्हणूनच म्हणतो...आता भ्रमात राहू नका आणि पुन्हा सत्ता मिळवायची असेल तर लोकांत जा आणि त्यांचा विश्‍वास पुन्हा मिळवा..

Web Title: Sunil Mali writes on EVM row