"सुप्रिया-काजल'चे अवघे विश्‍व बास्केटबॉल 

अभिजित हिरप - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 3 जानेवारी 2017

औरंगाबाद - त्या दोघी सख्ख्या बहिणी. स्वाभाविकच त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा सारख्याच. त्यांनी बाल्यावस्थेपासून स्वतःला बास्केटबॉलकरिता वाहून घेतले. पाहता पाहता जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्पर्धांत खेळून संघाचे नेतृत्त्वदेखील केले. ही यशोगाधा आहे शहरातील सुप्रिया आणि काजल मुंडले या सावित्रीच्या लेकींची. आता सुप्रियाचे स्वप्न आहे की, एक स्पोर्ट ऍकॅडमी सुरू करण्याचे तर काजलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉलमध्ये नावलौकिक मिळविण्याचे. 

औरंगाबाद - त्या दोघी सख्ख्या बहिणी. स्वाभाविकच त्यांच्या आवडीनिवडीसुद्धा सारख्याच. त्यांनी बाल्यावस्थेपासून स्वतःला बास्केटबॉलकरिता वाहून घेतले. पाहता पाहता जिल्ह्यापासून राष्ट्रीय स्पर्धांत खेळून संघाचे नेतृत्त्वदेखील केले. ही यशोगाधा आहे शहरातील सुप्रिया आणि काजल मुंडले या सावित्रीच्या लेकींची. आता सुप्रियाचे स्वप्न आहे की, एक स्पोर्ट ऍकॅडमी सुरू करण्याचे तर काजलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर बास्केटबॉलमध्ये नावलौकिक मिळविण्याचे. 

सुप्रिया आणि काजल यांचे वडील संजय मुंडले पोलिस खात्यात हेडकॉन्स्टेबल आहेत. हे कुटुंब मिलकॉर्नर येथील पोलिस कॉलनीत वास्तव्यास आहे. वर्ष 2003 मध्ये सुप्रिया सहावीमध्ये असताना पोलिस मैदानामध्ये नव्यानेच बास्केटबॉल खेळाचे कोर्ट तयार झाले होते. त्याठिकाणी ती वडिलांसोबत नेहमी जायची. तेव्हा तिला या खेळाबद्दल ओढ निर्माण झाली. त्यातूनच तिने वडिलांकडे हा खेळण्याची इच्छा व्यक्‍त केली. प्रशिक्षक सुशांत शेळके यांनी प्रोत्साहन दिले. इथूनच तिचा बास्केटबॉल प्रवास सुरू झाला. त्यानंतर शालेयस्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. दरम्यान, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथील प्रशिक्षक गणेश कड, मनजितसिंग दरोगा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. सुप्रियाने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून, अहमदनगरला सध्या कामानिमित्त स्थायिक आहे. मात्र, खेळातील राजकारणामुळे मराठवाड्यातील कित्येक मुलींना महाविद्यालयापलीकडे झेप घेता येत नाही. त्यामुळे मुलींसाठी खास स्पोर्ट ऍकॅडमी सुरू करण्याचे तिचे स्वप्न आहे. 

तिच्या पाठोपाठ तिची लहान बहीण काजलनेही शालेयस्तरापासून राष्ट्रीय पातळीवर बास्केटबॉल खेळामध्ये नावलौकिक मिळविला. आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची तयारी करीत आहे. या भगिनींनी राज्य पातळीवर ज्युनिअर आणि सिनीअर लेवलच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. त्याशिवाय विद्यापीठ आणि राज्यस्तरीय संघाचे नेतृत्त्व करण्याची संधीही त्यांना मिळालेली आहे. राज्यातील महापौर चषक स्पर्धेसह गोवा, राजस्थान, गुजरात, केरळ, बंगळूर येथे झालेल्या विविध स्पर्धा त्यांनी गाजविल्या. 

या खेळात मोठी बहीण सुप्रिया माझी प्रेरणा आहे. त्यासाठी प्रोत्साहन देणारे वडील माझे आदर्श आहेत. यापुढेही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची तयारी सुरू आहे. यश नक्‍कीच मिळेल. मात्र, तिथपर्यंत पोचताना कधीकधी अडचण येते. बहुतांशवेळी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी मोठ्या शहरातील खेळाडूंची निवड होते. प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळण्यासाठी शासनाने स्वतंत्र धोरण राबविल्यास खेळामध्ये महाराष्ट्र नक्‍कीच अग्रेसर होऊ शकतो. 
- काजल मुंडले, देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद. 

सुप्रिया आणि काजल या दोन्ही बहिणींचे गेल्या बारा वर्षांपासून बास्केटबॉलमध्ये सातत्य आहे. सुप्रियाने अभियांत्रिकी पूर्ण केले; तर काजल देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. अगदी कमी वयापासून त्यांनी बास्केटबॉलमध्ये स्वत:ला झोकून दिले. सर्वांगीण विकास साधावयाचा असल्यास खेळामध्ये जास्तीत-जास्त मुलींनी येण्याची आवश्‍यकता आहे. खेळामुळे खेळाडूंच्या आकलनात वाढ होते. 
- गणेश कड, प्रशिक्षक, बास्केटबॉल, मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, औरंगाबाद. 

खेळ असो अथवा अन्य क्षेत्र मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्यायला हवे. लहानपणापासून सुप्रिया आणि काजलला बास्केटबॉलची आवड होती. सध्या त्या राष्ट्रीयस्तरावर खेळलेल्या आहेत. यापुढेही त्या चांगली कामगिरी करतील, अशी अपेक्षा आहे. मुलगा आणि मुलगी यात भेदभाव न करता त्यांना खेळामध्ये प्रोत्साहन द्यावे. 
- संजय मुंडले, सुप्रिया-काजलचे वडील 

Web Title: supriya & kajal mundale