
'तीन तासाचं नाटक, जायचं अन्...', भाजप-मनसेच्या सभेवरून सुप्रिया सुळेंचा टोला
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज औरंगाबादेत (Raj Thackeray Sabha) सभा आहे. तसेच भाजपकडून (BJP) देखील सभेचा टीझर रिलीज करण्यात आला असून आज बूस्टर डोस सभा होणार आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची पोलखोल फडणवीस करणार आहेत. या दोन्ही सभेवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी टीका केली आहे.
राज्यात होणाऱ्या सभांकडं तुम्ही कसं पाहता? असं विचारलं असता त्या म्हणाल्या, “नाटक, नाटक असतं, तीन तास जायचं, आनंद घ्यायचा आणि घरी जायचं, ती वास्तविकता थोडीच असते ते नाटक असतं.” असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला. तसेच राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यांवरून अल्टीमेटम दिला आहे. त्यावर देखील सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली असून अल्टीमेटम शब्द माझ्या संस्कृतीत बसत नाही. यशवंतराव चव्हाण यांनी हा शब्द कधीच वापरला नव्हता. त्यामुळे या शब्दाचा अर्थ मला फारसा माहिती नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात यांचं सरकार अतिशय चांगलं काम करत आहे. मी असं म्हणत नाहीतर केंद्रातील आकडेवारी हे सांगतेय. आमच्याकडे सक्षम गृहमंत्री देखील आहेत. राज्यात आणि देशात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मी खासदार म्हणून लक्ष घालायला पाहिजे. दिल्लीत घडणाऱ्या घटनांमुळे मला खूप वेदना होतात. त्यामुळे महाराष्ट्रात अशा काही गोष्टी घडत असेल तर त्याकडे माझे लक्ष असेल, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
औरंगाबादेत राज ठाकरेंची सभा -
राज ठाकरेंनी सभेची घोषणा केली तेव्हापासून त्यांच्या सभेला विरोध झाला. राष्ट्रवादीसह अनेक पक्षांनी त्यांच्या सभेला विरोध दर्शवला. अखेर राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली असून आज मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा होत आहे. यापूर्वी झालेल्या दोन सभांमध्ये भोंगे आणि हनुमान चालिसा हे मुद्दे राज ठाकरेंनी लावून धरले होते. आजच्या सभेत नेमकं काय बोलतात? याकडे सर्वांचं लक्ष लागंल आहे.