

सोलापूर : सुमारे ९० आयकर अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे सहा वाजता सुरू केलेली सात बड्या व्यक्तींची तपासणी ३४ तास उलटले तरी सुरूच आहे. उलट गुरुवारी रात्री मुंबईहून दहा आयकर अधिकाऱ्यांचे आणखी एक पथक सोलापुरात दाखल झाले आहे. आपटे ज्वेलर्स आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार वेणेगुरकर, कोळी, हेरिटेजचे मनोज शहा, किमया कंन्स्ट्रकशनचे समीर गांधी, सराफ व्यापारी नारायणपेठकर आणि ॲड. उमेश मराठे यांच्याकडे गुरुवारी (ता. २०) दुसऱ्या दिवशीही तपासणी करण्यात आली. उद्याही (शुक्रवारी) तपासणी होऊ शकते, असे विश्वसनीय सूत्रांनी ‘सकाळ’ला सांगितले.
ज्वेलरी व्यवसाय, बांधकाम किंवा रिअल इस्टेट, सावकारी, फायनान्सिंग, कृषी उत्पन्नाचे व्यवहार या क्षेत्रामधील बिननोंदणी व रोखीचे व्यवहार, अनअकाऊंटेड स्टॉक, लोन-कॅश ट्रायल्स (खटल्याचा निकाल लागेपर्यंत घेतलेली रक्कम), अशा जोखीम निर्माण करू शकणाऱ्या बाबींची सध्या ‘आयकर’ची पथके पडताळणी करीत आहेत. त्यात संगणक, लॅपटॉप, हार्ड डिस्क, मोबाईलमधील चॅट, फोटो, ई-मेल आणि बॅकअप डेटा तपासला जात आहे. सोशल मीडियातून झालेल्या व्यवहारांची तपासणी व त्यांच्या जीवनशैलीचे विश्लेषणही केले जात आहे. त्यातून लपविलेले व्यवहार उघड होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
याशिवाय चौकशीतील प्रत्येकाचे बँक स्टेटमेंट्स, कॅश बुक, लेजर, व्हाउचर्स, चलने, स्टॉक रेकॉर्ड्सचीही तपासणी करण्यात येत आहे. कोणी अनावश्यक रोखीने व बिननोंदणी व्यवहार किंवा फक्त बँकिंग चॅनेलमधून व्यवहार केले आहेत का, याचीही कसून पडताळणी सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. तब्बल १०० अधिकारी या तपास कामात गुंतले आहेत. दरम्यान, अजूनपर्यंत चौकशी सुरु असलेल्यांपैकी कोणी किती कर चुकविला याबद्दल माहिती समोर आलेली नाही.
‘या’ बाबींची होतेय पडताळणी
कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे आर्थिक व्यवहार आणि त्या व्यवहारातील स्पष्टता
कुटुंबातील प्रत्येकाच्या उत्पन्नाचे स्रोत, अन्य व्यवसायातील कुटुंबाचा सहभाग
सोने, जंगम व अजंगम मालमत्तेतील मालकी, कर्ज, देणी आणि एकूण गुंतवणूक
चुकवलेल्या करावर लागणार २०० टक्के दंड
केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात कर सवलती (थेट कर व जीएसटी) जाहीर केल्या आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या महसुली तुटीच्या भरपाईसाठी अंमलबजावणी संचालनालयाने कारवाया वाढविल्या आहेत. एकूणच नव्या फायनान्स अॅक्टनंतर प्राप्तीकर विभागाने ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील बांधकाम व सराफ व्यावसायिकांची, त्यांच्या भागिदारांच्या व्यवहाराची तपासणी केली जात आहे. आता जेवढा कर चुकविला त्यावर २०० टक्के दंड व व्याज लावून त्यांना डिमांड चलन दिले जाणार आहे. त्यानुसार त्या व्यावसायिकांना काही दिवसांत ती रक्कम भरावीच लागेल, असेही अधिकारी म्हणाले.
संशय वाढल्याने मुक्कामही वाढला...
‘आयकर’च्या छाप्यावेळी अधिकाऱ्यांनी सोलापूर शहर पोलिसांकडून ३० अंमलदार बंदोबस्तासाठी घेतले आहेत. सुरवातीला एकाच दिवसासाठी बंदोबस्त मागितला होता. पण, व्यवहारातील संशय वाढल्याने अधिक तपासासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांचा सोलापुरातील मुक्काम वाढला. त्यामुळे ज्यांच्या घरी, दुकाने, व्यावसायांवर धाडी पडल्या, तेथील पोलिसांची ड्युटीही वाढली आहे. त्यांना संबंधित ठिकाणी २४ तास ड्युटी दिली असून त्याठिकाणी कोण येते, कोण बाहेर जाते यावर त्यांचे लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.