भारतीय संस्कृतीच्या प्रसारास कटिबद्ध

आळंदी येथे हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक व प्रचारक, अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष व मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज अंकित काणे यांची घेतलेली त्यांची विशेष मुलाखत...
Swami Govinddev Giri Maharaj
Swami Govinddev Giri Maharajsakal

हिंदू धर्मशास्त्राचे अभ्यासक व प्रचारक, अयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष व मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीचे उपाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्यानिमित्त आळंदी येथे विविध कार्यक्रमही होत असून, हे औचित्य साधून अंकित काणे यांनी घेतलेली त्यांची विशेष मुलाखत...

प्रश्न - आपण विविध संस्थांचे विश्‍वस्त आहात, श्रीराम जन्मभूमी, श्रीकृष्ण जन्मभूमीसोबतच असंख्य प्रतिष्ठान, गुरुकुल यांचे संचालक आहात. रोज शेकडो किलोमीटरचा प्रवास, प्रवचने करता. ही ऊर्जा येते कोठून?

- गोविंददेव गिरी महाराजः मी गेल्या पन्नास वर्षांत एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. मी देहभान विसरून काम करतो, त्यामुळे ऊर्जा कशी येते, का येते हा विचारच मनात येत नाही. माझ्या समोरची ध्येयेच मला गतिमान करतात. या समाजाचे आणि देशाचे आपण देणे लागतो, त्यामुळे सतत परमेश्‍वराला स्मरून कार्यरत राहणे हे मला आवश्यक वाटते.

राममंदिर आणि आपण एक समीकरण झाले असलात, तरी आपले काम त्यापलीकडे त्यापेक्षा खूप मोठे आहे. आपल्या या कार्याविषयी आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल.

- मला लहानपणापासूनच संस्कृती प्रेमाचे आणि राष्ट्रप्रेमाचे संस्कार घरातच मिळाले. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या परिसस्पर्शाने माझ्या आयुष्याचे क्षितिज विस्तारले. संपूर्ण विश्‍वाचे मांगल्य ज्यात आहे, ते म्हणजे आपले वेद आणि त्या वेदांचे पुनरुत्थान करावे, हे माझ्या मनाने कमी वयातच ठरवले. या वेदांच्या प्रचारासाठी १९९०मध्ये ‘महर्षी वेद व्यास प्रतिष्ठाना’ची स्थापना केली. वेदांचे उत्तम प्राध्यापक घडवणे, प्रशिक्षित पुरोहित घडवणे आणि वेदांचे संरक्षण करणे हा उद्देश. या माध्यमातून आज देशभरात ३६ वेदपाठशाळा चालतात. या सर्व वेदांचे सार श्रीमद् भागवत गीतेत आहे. संपूर्ण विश्‍वाला देण्यासारखे आपल्याकडे काय आहे, तर ती गीता आहे. या गीतेच्या प्रचारासाठी ‘गीता परिवार’ कार्यरत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज गुरुकुल, वेदश्री तपोवन अशा असंख्य संस्थांच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य सुरू आहे.

ऋषींचे कुळ आणि मूळ विचारू नये, असे म्हणतात. मात्र, आपल्या पूर्वाश्रमीच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.

- राजस्थानातले सरगाव हे आमचे मूळ गाव. तिथून आमचे पणजोबा मस्तकी भागवत गीता घेऊन चालत नगर जिल्ह्यातील बेलापूर येथे आले आणि या मातीतलेच झाले. माझा जन्मदेखील बेलापूरचाच. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर भगवंताची कृपा अशी, की पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या तत्त्वज्ञान विद्यापीठात मला प्रवेश मिळाला. त्यांचा माझ्यावर खूप मोठा प्रभाव आणि संस्कार. आज जे काही आहे ते त्यांच्यासारख्या ऋषींच्या आशीर्वादानेच, ही कृतार्थतेची भावना कायम मनात आहे. तत्त्वज्ञान विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर वेदांच्या पुढील शिक्षणासाठी मी काशीला गेलो. महाराजांनी काशीत असंख्य विद्वानांच्या मार्गदर्शनाखाली वेद, संस्कृती आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास पूर्ण केला आणि धर्मकार्य सुरू केले, ते आजतागायत कायम आहे.

आपल्या जडणघडणीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेदेखील मोठे योगदान आहे, असे वाटते का?

- मी स्वयंसेवक कधी झालो, हे समजलेच नाही, बहुधा पाळण्यातच स्वयंसेवक झालो. दामूआण्णा दाते यांच्यासारख्या प्रचारकांच्या संस्कारात आम्ही वाढलो. संघाच्या या संस्काराने आयुष्याला शिस्त लागली, ध्येयवाद जोपासला गेला, मानवतेचे कल्याण आणि माझे व्यक्तिगत कल्याण कशात आहे याचा मी अभ्यास केला. संपूर्ण विश्‍वाचे कल्याण करणारे विचार वेदांमध्ये आहेत आणि ते सर्व काही भारतीय संस्कृतीचे संचित सामाजिक जीवनात उतरवण्याचे सामर्थ्य फक्त संघात आहे, हा विश्‍वास झाला.

सध्या सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती यावर टीका करण्याची ‘फॅशन’ आली आहे. सवंग प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी होतात का?

- अशा लोकांकडे मी अनुकंपेने बघतो. या मंडळींचा मला राग येत नाही, कारण ते अज्ञानाने बोलतात आणि त्यातील काही कोणाचे तरी ‘एजंट’ बनून बोलतात. शुद्ध बुद्धीने विचार करणाऱ्या कोणालाही माझे आवाहन आहे, की सत्याचा शोध घायचा असल्यास तो वेदान्ताच्या पद्धतीने कसा घेता येतो हे मी दाखवून देईन. मात्र, त्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. अशा चर्चेचे स्वागतच आहे. अशा पद्धतीने जो सत्याचा शोध घेईन, त्याला शेवटी वेदांताचा खरा अर्थ सापडेलच याची मला खात्री आहे. आजकाल प्रत्येक गोष्टीत आपण राजकारण आणतोय आणि सगळ्या गोष्टींची नासाडी करतोय. हे बंद होऊन भारतीय या नात्याने सर्वांनी एकत्र आले पाहिजे.

संन्यस्त पद्धतीने जीवन जगण्याचा विचार नेमका कसा आला?

- संन्यास घ्यायचा विचार नव्हता, पण प्रपंचात अडकायचे नाही हे नक्की केले होते. माझ्या आयुष्यावर तिघांचा विशेष प्रभाव. समर्थ रामदास स्वामी, आदि शंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद. यांच्या जीवनातील प्रवृत्तीपर वेदांत आपल्याला कसा आचरता येईल या विचारात मी होतो. मात्र, कार्य करतानाच संन्यास माझ्या आयुष्यात आला आणि मी तो स्वीकारला. स्वामी सत्यमित्रानंदजींच्या मार्गदर्शनाने कांची पीठाच्या शंकराचार्यांनी संन्यासाची दीक्षा दिली.

रामजन्मभूमीनंतर आता पुढचा विषय श्रीकृष्ण जन्मभूमीचा येतोय. आपण त्या न्यासाचेही उपाध्यक्ष आहात. राम मंदिराप्रमाणे मथुरेतही काही भव्यदिव्य होईल?

- भारतात इतिहासात ३५००हून अधिक मंदिरांची मोडतोड झाली. त्या सर्व मंदिरांवर काही आमचा दावा नाही. त्यातील अयोध्या, काशी आणि मथुरा ही तीन मंदिरे आमच्या स्वाभिमानाचा विषय आहेत, आमची श्रद्धास्थाने आहेत. अयोध्येत राम मंदिर उभे राहिले, आता सर्व समाजाने सामोपचाराने काशी विश्‍वनाथ आणि मथुरेतील कृष्णभूमी मुक्त करण्यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे. हा प्रश्न सर्वांच्या सहकार्याने मिटेल, याची मला खात्री आहे.

आपण या वयातही न थकता काम करताय, धर्मप्रसारासाठी आपण मोठे काम उभे केले आहे. यापुढील डोळ्यांसमोरील काही उद्दिष्टे आणि आव्हाने?

- देशभरात ३६ विद्यालये सुरू झाली आहेत, मात्र ही कामाची पूर्तता नसून सुरुवातच आहे. देशभरातून वेदांच्या अध्यापकांची मागणी आहे. श्रद्धावान आणि विद्वान अध्यापक देशाला पुरवायचे आहेत. भारतीय संस्कृतीचा जगभर प्रसार व प्रचार करायचा आहे. त्या सर्व कार्यासाठी परमेश्‍वराने कायम ऊर्जा द्यावी, अशी प्रार्थना. भारतात सर्वांनी आनंदाने नांदावे, आपल्या वेदांच्या विचाराने संपूर्ण विश्‍वात सुख शांती लाभावी.

‘जो जें वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com