
सोलापूर : भीमा खोऱ्यातील धरणांमध्ये २४३ टीएमसी पाणी अपेक्षित आहे. परंतु, पावसाळा संपून महिना होण्यापूर्वीच त्या धरणांमध्ये १९८ टीएमसी (सरासरी ७५ टक्के) पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पुढच्या पावसाळ्याला सात महिन्यांचा अवधी असतानाच धरणांमधील पाण्याची सद्य:स्थिती पाहता ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार हे निश्चित.
राज्यात अजूनही ४५ लाख हेक्टर जमीन पूर्णपणे सिंचनाखाली आलेली नाही. त्यांना धरण किंवा मध्यम प्रकल्पांचाच आधार आहे. मात्र, यंदा पाऊस कमी झाल्याने बहुतेक मोठी धरणे १०० टक्के भरली नाहीत आणि मध्यम प्रकल्पांनीही तळ गाठला आहे.
पावसाअभावी खरीप वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बीतून मोठी आशा आहे. परंतु, धरणातून वेळेत पाणी न मिळाल्यास रब्बी हंगामालाही मोठा फटका बसू शकतो, अशी वस्तुस्थिती आहे. राज्यातील नाशिक, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, जालना, जळगाव, पुणे व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये दिवसेंदिवस टॅंकर वाढत आहेत. मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदाचा टंचाई आराखडा ५०० कोटींनी अधिक असू शकतो, असेही पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
शासनाच्या निकषांनुसार दररोज प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी मिळणे अपेक्षित आहे. परंतु, सोलापूर शहरातील नागरिकांना ४ दिवसानंतर एकदाच त्या प्रमाणात पाणी मिळते. ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज ७० लिटर पाणी मिळणे अपेक्षित असून त्याठिकाणी देखील दोन दिवसाआड पाणी मिळते. वीजेचा काही अडथळा निर्माण झाल्यास तीन दिवसांनी एकदा पाणी मिळते. पावसाळा संपून एक महिना झाल्यानंतर ही आवस्था आहे. त्यामुळे उन्हाळ्यात काय स्थिती राहील, याची चिंता नागरिकांना सतावू लागली आहे.
गतवर्षी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पाण्यासाठी राज्यात एकही टॅंकर सुरु नव्हता. पण, यावर्षी २६ नोव्हेंबरपर्यंत पावणेचारशे गावे व एक हजार वाड्या-वस्त्यांना ४१४ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. सध्या राज्यभरात दिवसेंदिवस टॅंकरची संख्या वाढत आहे. राज्यातील दुष्काळी स्थिती पाहता ३० जूनपर्यंत राज्यात दोन हजारांपर्यंत टॅंकर सुरू असतील, असा अंदाज पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने वर्तविला आहे.
उजनी धरण यंदा पावसाळ्यात ६६ टक्क्यांपर्यंतच भरले. सध्या शेतीला कॅनॉलद्वारे पाणी सोडले असून १५ डिसेंबरपर्यंत ते बंद होईल. त्यानंतर सोलापूर शहरासाठी पाणी सोडावे लागेल. यंदा फेब्रुवारीतच धरण उणे होईल. धरणात सध्या ३३.५० टक्के पाणी आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर
पिंपळगाव जोगे (७८.४१ टक्के), माणिकडोह (७७.३९ टक्के), येडगाव (९४.८६ टक्के), वडज (९५.६८ टक्के), डिंभे (९५.०३ टक्के), घोड (९४.३४ टक्के), विसापूर (५३.९० टक्के), चिल्हेवाडी (९७.२३ टक्के), कळमोडी (९९ टक्के), चासकमान (९४. ६२ टक्के), भामा आसखेड (८६.७४ टक्के), वडीवळे (९४.८० टक्के), बांद्रा (८८.७८ टक्के), पवना (८६.८७ टक्के), कासारसाई (९२.५२ टक्के), मुळशी (८३ टक्के), देवधर (५७.६० टक्के), वरसगाव (९२ टक्के), पानशेत (९५.८० टक्के), खडकवासला (७३.५३ टक्के), गुंजवणी (९६ टक्के), निरा देवधर (९१.४६ टक्के), भाटघर (९०.७८ टक्के), वीर (५६ टक्के), उजनी (३३.५० टक्के).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.