टाटाची धुरा चंद्रशेखरन यांच्या हाती

पीटीआय
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

मुंबई - "टीसीएस'चे मुख्य कार्यकारी आणि विद्यमान संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून गुरुवारी घोषणा करण्यात आली. कॉर्पोरेट जगतात "चंद्रा' नावाने म्हणून परिचित असलेले चंद्रशेखर येत्या 21 फेब्रुवारीला टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.

मुंबई - "टीसीएस'चे मुख्य कार्यकारी आणि विद्यमान संचालक नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून गुरुवारी घोषणा करण्यात आली. कॉर्पोरेट जगतात "चंद्रा' नावाने म्हणून परिचित असलेले चंद्रशेखर येत्या 21 फेब्रुवारीला टाटा सन्सच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील.

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची 24 ऑक्‍टोबरला तडकाफडकी हकालपट्टी केल्यानंतर नव्या अध्यक्षाच्या निवडीसाठी टाटासमूहाने रतन टाटा, वेणू श्रीनिवासन यांच्यासह पाच जणांची समिती स्थापन केली होती. निवड समितीने एकमताने शिफारस केलेल्या चंद्रशेखरन यांच्या नावावर टाटा सन्सच्या संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले. चंद्रशेखरन यांच्या निवडीने समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्तता होणार आहे.

चंद्रशेखरन टाटा समूहात 1987 मध्ये दाखल झाले. 54 वर्षीय चंद्रा आणि आपला निम्म्याहून अधिक काळ टाटा समूहात व्यतित केला आहे. गेल्या तीन दशकात त्यांनी समूहातील अनेक चढ-उतार अनुभवले आहेत. 2002 मध्ये त्यांनी "टीसीएस'च्या जागतिक विक्री विभागाची जबाबदारी सांभाळली होती. 2007 मध्ये ते टीसीएसच्या कार्यकारी संचालक झाले.

2009 पासून ते "टीसीएस'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वात टीसीएसने दमदार कामगिरी केली असून, गेल्या आर्थिक वर्षात सर्वाधिक भांडवल (70 अब्ज डॉलर) असणारी माहिती तंत्रज्ञान कंपनी ठरली. मिस्त्री यांच्या हकालपट्टीनंतर दुसऱ्याच दिवशी चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अतिरिक्त संचालकपदी नेमणूक करण्यात आली.

टीसीएसमध्ये खांदेपालट
चंद्रशेखर टाटा सन्सचे अध्यक्ष बनल्यानंतर टीसीएसमध्येही खांदेपालट करण्यात आला आहे. चंद्रशेखर यांच्या जागी मुख्य वितीय अधिकारी राजेश गोपीनाथन यांची "टीसीएस'चे मुख्य कार्यकारी म्हणून निवड केली आहे.

"टीसीएस'मध्ये मुख्य कार्यकारी असताना एन. चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाचे गुण दिसून आले आहेत. त्यांचे नेतृत्व टाटा समूहासाठी प्रेरणादायी ठरेल. नीतिमूल्यांच्या आधारे टाटा समूह पुन्हा आघाडीवर येईल, असा विश्‍वास आहे.
- संचालक मंडळ, टाटा सन्स

संपन्न वारसा लाभलेल्या टाटा समूहाची धुरा माझ्यावर सोपवून माझ्यावर जो विश्‍वास दाखवला आहे, त्याबद्दल मी टाटा सन्स आणि रतन टाटा यांना धन्यवाद देतो. मला जबाबदारीची जाणीव असून, समूहाच्या वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.
- एन. चंद्रशेखरन, नवनिर्वाचित अध्यक्ष, टाटा सन्स

शेतकऱ्याचा मुलगा ते टाटा समूहाचा अध्यक्ष
- एका शेतकरी कुटुंबात जून 1963 मध्ये जन्म
- वडील श्रीनिवासन नटराजन पेशाने शेतकरी व वकील
- कोईमतूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधून विज्ञान शाखेची पदवी
- त्रिचीमधील अभियांत्रिकी महाविद्यालयातून कॉम्प्युटर ऍप्लिकेशनमधून पदव्युत्तर पदवी
- माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची शिखर संघटना असलेल्या नॅसकॉमचे अध्यक्षपद
- 5 मार्च 2016 पासून ते रिझर्व्ह बॅंकेचे संचालक (नॉन ऑफिशिअल)

Web Title: tata group new chairman natrajan chandrashekhar