राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया ठप्प

तात्या लांडगे 
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

झेडपी शिक्षकांची 21 हजार पदे रिक्‍त - 64 हजार टीईटी उत्तीर्ण

झेडपी शिक्षकांची 21 हजार पदे रिक्‍त - 64 हजार टीईटी उत्तीर्ण
सोलापूर - राज्यात मागील चार वर्षांपासून शासनस्तरावरून शिक्षक भरतीची प्रक्रिया ठप्प आहे. सद्यःस्थितीत राज्यातील खासगी अनुदानित व जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये 20 हजार 661 शिक्षकांची पदे रिक्‍त असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाकडून सांगण्यात आली. दुसरीकडे मात्र 2015 पासून आतापर्यंत राज्यातील सुमारे 64 हजार टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील सुमारे साडेआठ हजार शाळा पूर्णवेळ शिक्षकाविनाच चालतात; तसेच सुमारे 29 हजार वर्गांमध्ये पूर्णवेळ शिक्षक नसल्याने त्याचा अतिरिक्‍त पदभार अन्य शिक्षकांकडे सोपविण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असल्याने पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वाढला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्‍त असूनही भरती निघाली नसल्याने टीईटी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी अनेकांचे नोकरीचे वय निघून जात असून, दुसरीकडे पटसंख्येअभावी अतिरिक्‍त झालेल्या शिक्षकांचाही प्रश्‍न गंभीर बनला आहे. खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये 27 टक्‍के पदे रिक्‍त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकारतर्फे लवकरच भरती काढली जाईल, असे शिक्षणमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली. याबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध झाले नाहीत.

आकडे बोलतात...
जिल्हा परिषद शाळा - 62,134
मंजूर पदे - 2,36,036
रिक्‍त पदे - 19,189
खासगी अनुदानित शाळा - 8033
मंजूर पदे - 35,319
रिक्‍तपदे - 1472
टीईटी उत्तीर्ण विद्यार्थी - 64,128

Web Title: teacher recruitment process stop