#शिक्षकदिन : शिक्षक जेव्हा 'आई' होतो

#शिक्षकदिन : शिक्षक जेव्हा 'आई' होतो

एखादा शिक्षक मुलांसाठी काय काय  करू शकतो असं तुम्हाला वाटतं?  त्याला  खूप चांगलं शिक्षण देणं, चांगल्या सवयी लावणं, समजावून घेणं, बस्स इतकंच? पण तुम्हाला जर सांगितलं की जालना जिल्ह्यातील एका शिक्षकाने, कुत्र्याच्या पिलांना चावण्याची सवय असलेल्या एका विद्यार्थ्याला माणसाळवलं आहे, नैसर्गिक विधींचेही भान नसणाऱ्या त्या मुलाला, आता शाळेत नियमित येणारा स्वच्छ विद्यार्थी बनविले आहे, या विशेष (गतिमंद) मुलाला सर्वसमान्य मुलांप्रमाणे विकसित केलं आहे तर तुमचा विश्वास बसेल? ही सत्यकथा आहे मंठा तालुक्यातील माळतोंडी गावच्या सखाराम भाबट या मुलाची आणि त्याला आत्मनिर्भर बनविणाऱ्या अविनाश लोमटे सरांची.

#शिक्षकदिन

``या सगळ्या गोष्टीला आता सात-आठ वर्षे होऊन गेली,`` लोमटे सर सांगतात, ``आम्ही शिक्षक २०१० च्या जून महिन्यात माळतोंडीच्या जिल्हा परिषद शाळेसाठी गावातील प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचा शोध घेत घरोघर भेटी देत होतो. गावात एका ठिकाणी वाळूच्या ढिगाऱ्याजवळ कुत्र्याच्या पिलाच्या पोटाजवळ दात नेणाऱ्या सखारामला मी पाहिलं आणि मी त्याला ओरडलोच, ‘बाजूला हो पोरा, कुत्रा चावेल.’ तोंडातून लाळ गाळणारा सखाराम विचित्र हसत तिथेच बसून राहिला. मला कळेना हा कोणाचा मुलगा आहे. तिथून जवळच असलेल्या मातीच्या घरात मी डोकावलो. तेच सखारामचं घर होते. घरात त्याचे आजारी वडील, आणि म्हातारी आजी होती, आई कामासाठी बाहेर गेली होती.``

``मी त्या आजींना म्हणालो- ‘अहो बाहेर तुमच्या नातवाला कुत्रा चावेल, पाहा तरी त्याच्याकडे!’ त्यावर आजी म्हणाल्या, ‘त्याचं रोजचंच हाय त्ये, कुत्रं बी वळखीचं हाय. काही करत नाही. काय करणार साह्येब बापावरच गेलंय पोरगं!` असं म्हणून त्यांनी डोळ्याला पदर लावला. सखारामची परिस्थिती मला बघवेना. तो असाच घरात बसून राहिला तर त्याची परिस्थिती बिघडतच जाईल हे मला कळत होतं. म्हणून मी त्याच्या आजींना सखारामला शाळेत पाठवा, अशी विनंती केली. आजी तयारही झाल्या, ‘पर बाकीच्या पोरांना नि त्यांच्या आयबापाला चालंल का आमचा नातू साळंत आला तर?’ असं त्यांनी निरागसपणे विचारलं. ‘ते सगळं मी सांभाळीन आजी, तुम्ही फक्त सखारामला शाळेत पाठवा’ असं मी त्यांना म्हणालो`` लोमटे सर सांगत होते.

सखाराम त्याच्या मोठ्या भावासोबत शाळेत येऊ लागला. लोमटे सर सांगतात, ``सखारामच्या तोंडातून सतत लाळ गळायची. कपडे मळलेले असायचे. नाक गळत असायचं. इतकंच नाही तर त्याला नैसर्गिक विधींना जाण्याचंही भान नव्हते. मीच रूमाल घेऊन त्याचं नाक साफ करायचो, त्याला स्वच्छतागृहात घेऊन जायचो. इतर शिक्षक मला म्हणू लागले, ‘कुठून ही झंझट ओढवून घेतलीस, तो पोरगा सुधारणार नाही’. पण सखारामविषयी माझ्या मनात करुणाच दाटून आली होती. तोही माणूसच आहे, आणि त्याला मायेने वाढवलं तर तो सुधारेल असा मला विश्वास होता. सुरुवातीला मुलंही त्याला शेजारी बसवून घ्यायची नाहीत. पण मी हळूहळू विद्यार्थ्यांना समजावीत गेलो, सखारामला समजून घ्या, त्याला चिडवू नका. आणि मुलांनाही ते कळायला लागलं.``

सखाराम हा विशेष मुलगा (गतिमंद) आहे. त्याचे वडीलही लहानपणी असेच वागायचे असे लोमटे सरांना कळाले. त्याच्या वडिलांना त्या काळी माळतोंडी शाळेत कार्यरत असलेल्या शेंडगे सरांनी सुधारलं होतं, (ते सध्या वाटूर फाट्याला केंद्रप्रमुख आहेत) अशी माहिती लोमटे सरांना मिळाली. त्यांनी शेंडगे सरांशी चर्चा करून सखाराममध्ये सुधारणा कशी करता येईल, याची माहिती घेतली. तेव्हाचे माळतोंडी शाळेचे मुख्याध्यापक राठोड सरही (सध्या गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत) लोमटे सरांच्या माणुसकीच्या कामाला पाठिंबा देत होते. अनेकदा सखाराम शाळेत रडायचा, त्यावेळी त्याच्या नाकातून रक्त वाहू लागायचे. लोमटे सरही घाबरून जायचे. त्यावेळी राठोड सर धीर द्यायचे. लोमटे सरांनी त्याची सततची सर्दी आणि नाकातून रक्त येणे, याबाबत तेथील सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. पटेल आणि डॉ. आदमपूरकर यांचा सल्लाही घेतला. लोमटे सरांनी सखारामची तपासणी करून त्याला वेळेवर औषधपाणी केलं आणि मग त्याला आराम पडला.

लोमटे सर सखारामला हळूहळू स्वच्छतेच्या सवयी लावत होते. ते त्याला दर अर्ध्या तासाला स्वच्छतागृहात घेऊन जायचे. मग सखारामला नैसर्गिक विधींचे भान हळूहळू येऊ लागले. त्याची नखे कापणे, नाक स्वच्छ ठेवणे, त्याला कुत्र्यांजवळ फिरकू न देणे, सखारामने केलेल्या छोट्या- छोट्या गोष्टींचे कौतुक करणे, त्याला मायेने जवळ घेणे, रंगीत पुस्तके- ठोकळे त्याला हाताळायला देणे, चॉकलेट देणे अशा अनेक गोष्टी लोमटे सरांनी केल्या. त्यामुळे दुसरीपासून त्याचे कुत्र्यांशी खेळणे, नाक गळणे बंद झाले. 

तो हळूहळू पाटीवर काही गिरवण्याचा प्रयत्न करू लागला. बाकीची मुलंही त्याला सामावून घेऊ लागली. मात्र तो इतर मुलांशी फारसा बोलायचा नाही. सखाराम तिसरीत गेल्यानंतर तत्कालीन गटशिक्षणाधिकारी नागेश मापारी (सध्या जालन्याचे उपशिक्षणाधिकारी) सरांनी शाळेला भेट दिली, तेव्हा मात्र सखाराम स्वत:हून त्यांच्याशी बोलला. सखाराम आता लोकांमध्ये मिसळू लागला आहे हे पाहून लोमटे सरांना खूपच आनंद झाला.

सखाराम व्यवस्थित राहू लागला, नीट बोलू लागला. पाचवीत जाईपर्यंत वाचन- लेखन, अगदी गुणाकार- भागाकारही त्याला जमू लागलं. मात्र तो पाचवीत असतानाच लोमटे सरांची बदलीची ऑर्डर आली. सखारामचा चेहरा अगदीच पडला. वर्गातले बाकीचे विद्यार्थीही नाराज झाले. गावातील पालकांना जेव्हा ही गोष्ट कळाली, तेव्हा तेही नाराज झाले, कारण लोमटे सरांच्या मेहनतीमुळे त्या वर्षी माळतोंडी शाळेतील ११ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती. पालक सरांना सोडायला तयार नव्हते. सरांनी विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालय प्रवेशासाठीची तयारी करवून घ्यावी, असे गावाचे मत होते. गावाने पंचायत समितीच्या सभापतींना आणि गटशिक्षणाधिकारी मापारी सरांना विनंती करून लोमटे सरांची बदली थांबविली. त्यामुळे सरांना माळतोंडी शाळेत प्रतिनियुक्तीवर आणखी एक वर्ष थांबता आले. सखाराम तर खूपच खूश झाला.

त्यानंतरच्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये लोमटे सरांची वीरगव्हाण तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत बदली झाली. सरांना माळतोंडी शाळेला आणि सखारामला सोडून नव्या शाळेत रुजू व्हावे लागले. या बंजारा तांड्यावरील शाळेतही सरांनी अनेक उपक्रम घेतलेले आहेत. या शाळेतील मुलांचे पालक ऊसतोडणी कामगार आहेत. दरवर्षी किमान ५० टक्के मुले तरी पालकांसोबत स्थलांतर करायची. वीरगव्हाण तांड्यातील पालकांच्या वैयक्तिक भेटी घेऊन, त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून लोमटे सरांनी आणि गडदे आणि जयस्वाल सरांनी हे स्थलांतर जवळपास १०० टक्के थांबवले आहे. ज्या शाळेच्या प्रांगणात एकही रोप नव्हतं, तिथे आता २९ झाडं आहेत. वीरगव्हाण शाळेला ४८ हजार रुपयांचा लोकसहभागही मिळालेला आहे. ज्यातून या  शाळेत एलईडी टीव्हींच्या माध्यमातून ई-लर्निंग सुरू करण्यात आलंय. यासाठी राऊतवाड सरांनीही मदत केली.

दुसरीकडे सखाराम आता आठवीत गेलेला आहे. माळतोंडी सोडलेलं असलं तरी लोमटे सर त्याच्या संपर्कात असतात. सखाराम हा सध्या पांगरी बुद्रुकच्या शिवाजी विद्यालयात शिकतोय. तो अतिशय नियमित शाळेला जातो. 

कोणाला सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नाही की सखाराम हा विशेष विद्यार्थी आहे. लोमटे सर म्हणतात, ``इतरांसारखं मी सुद्धा सखारामकडे दुर्लक्ष केलं असतं आणि नुसता हळहळून गप्प बसलो असतो, तर आज सखाराम इथपर्यंत पोचलाच नसता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे फक्त कर्तव्यभावनेने पाहून चालत नाही, काही वेळा त्यांची आईसुद्धा व्हावं लागतं. मी तेच केलं. आज सखाराम माणूस म्हणून एक चांगलं आयुष्य जगतोय याचा मला आनंद आहे.``

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com