मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन वर्षांच्या मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच म्हणून शिक्षक ‘टीईटी’चा अभ्यास करीत आहेत. २१ जून रोजी पुढील ‘टीईटी’ होणार असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज (बुधवारी) वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु, याच काळात शिक्षकांना १६ मे ते १४ जूनपर्यंत घरगणनेचे काम करावे लागणार आहे.
Maharashtra TET Result

Maharashtra TET Result

sakal 

Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन वर्षांच्या मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावीच म्हणून शिक्षक ‘टीईटी’चा अभ्यास करीत आहेत. २१ जून रोजी पुढील ‘टीईटी’ होणार असून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आज (बुधवारी) वेळापत्रक जाहीर केले आहे. परंतु, याच काळात शिक्षकांना १६ मे ते १४ जूनपर्यंत घरगणनेचे काम करावे लागणार आहे.

जनगणनेसाठी नेमलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांना २७ एप्रिल ते ८ मेपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून या कालावधीत घरगणना होणार आहे. या कामासाठी अधिक प्रमाणात शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आली आहे. २ मे ते १४ जून या कालावधीत दरवर्षी शिक्षकांना उन्हाळी सुट्टी असते. मात्र, यंदा याच काळात जनगणनेचा पहिला टप्पा, म्हणजेच घरगणना होत आहे. त्यामुळे यंदा सर्व शिक्षकांना उन्हाळी सुट्टी मिळणार नाही. कोणतेही कारण देऊन शिक्षकांना या कामातून सुटका करून घेता येणार नाही.

जनगणनेची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रत्येक कर्मचाऱ्यावर लक्ष असणार आहे. त्यामुळे सर्वांना घरोघरी जाऊनच जनगणना करावी लागणार आहे. दरम्यान, याच काळात शिक्षकांना जनगणनेचे काम करून २१ जूनला होणाऱ्या ‘टीईटी’चा देखील अभ्यास करावा लागणार आहे.

असे आहे वेळापत्रक

  • ऑनलाईन अर्ज : २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत

  • प्रवेशपत्र प्रिंट काढणे : ९ ते २१ जूनपर्यंत

  • पहिला पेपर : २१ जून (सकाळी साडेदहा ते दुपारी एक)

  • दुसरा पेपर : २१ जून (दुपारी अडीच ते सायंकाळी पाच)

पहिली ते आठवीसाठी ‘टीईटी’ बंधनकारक

इयत्ता पहिली ते पाचवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी पेपर एक आणि सहावी ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांसाठी पेपर दोन बंधनकारक आहे. सर्व व्यवस्थापनांतील, सर्व परीक्षा मंडळांतील, सर्व माध्यमांच्या अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांमधील शिक्षणसेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या १ सप्टेंबर २०२५ रोजीच्या निर्णयानुसार इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर नियुक्त, सेवेतील ५३ वर्षांपर्यंतच्या सर्व शिक्षकांना देखील दोन वर्षांच्या मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. त्यामुळे या परीक्षेसाठी सर्वाधिक शिक्षकच परीक्षार्थी असतील, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com