तेजस्वी सातपुतेंचे 'ऑपरेशन परिवर्तन' बंद, सोलापुरात वाढली हातभट्टीची नशा! आजोबाने सांभाळलेली जमीन नातवाने विकली, आता दररोज नशेत तर्रर्र, आईच्या नशिबी पुन्हा संघर्ष

गावातील अनेक तरुण हातभट्टीच्या आहारी जात असून, त्यांच्या कुटुंबात सतत भांडणे सुरू असतात. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी, गावकऱ्यांनी सोलापूर तालुका पोलिसांना वारंवार निवेदने दिली, गावातील हातभट्टी दारू विक्री बंद करण्याची विनंतीही केली. मात्र, गावागावांतील स्थिती ‘जैसे-थे’च आहे.
Tejaswi Satpute Social Work
Tejaswi Satpute Social Worke sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : वडील हातभट्टीच्या आहारी, घरी पत्नीसोबत सतत भांडण, याला वैतागून विवाहिता भावाकडे राहायला कुरुल (ता. मोहोळ) येथे गेली. तीन मुली, एक मुलगा आणि पती मद्यपी, यांची जबाबदारी खांद्यावर घेत त्या विवाहितेने संसार नेटाने केला. तिन्ही मुलींचे विवाह झाले, पतीमध्ये सुधारणा झाली, मुलगा मोठा झाला. आता ती विवाहिता पती व एकुलत्या एक मुलाला घेऊन सासरी आली. पण, मुलगा गावात सहज उपलब्ध होणाऱ्या हातभट्टीच्या आहारी गेला आणि त्याने वडिलांना मारले, दोन एकर जमीन विकली. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून गाव सोडलेल्या त्या विवाहितेच्या नशिबी पुन्हा पहिल्यासारखीच स्थिती ओढवली आहे. ही व्यथा आहे पडसाळी (ता. उत्तर सोलापूर) गावची.

सोलापूर ग्रामीणच्या तत्कालीन पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ‘हातभट्टीचा सोलापूर जिल्हा’ ही ओळख पुसून टाकण्यासाठी ‘ऑपरेशन परिवर्तन’ हे विशेष अभियान हाती घेतले. हातभट्टी दारू तयार करणारी ठिकाणे व हातभट्टीची विक्री होणाऱ्या गावांची यादी तयार केली. ती गावे आपल्या अधिकाऱ्यांना दत्तक दिली आणि आठवड्यातून दोनदा त्या गावांमध्ये जावे, हातभट्ट्यांवर आठवड्यातून दोन ते तीनदा कारवाई करण्याची योजना आखली.

हातभट्टीच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांचे प्रबोधन केले आणि त्यांच्या हाताला पर्यायी रोजगार देखील मिळवून दिला. आता आपला नवरा, मुलगा दारू सोडणार, अशी आशा गावागावांतील विवाहितांना वाटू लागली. त्याचा परिणामही दिसू लागला. पण, आता पूर्वीसारखीच स्थिती पाहायला मिळत आहे. अनेक विवाहिता मद्यपी पतीच्या त्रासाला वैतागून माहेरी गेल्याचीही उदाहरणे आहेत. गावागावांत किरकोळ भांडणे, कौटुंबिक वादाचे मूळ गावात सहजपणे मिळणारी हातभट्टीच असल्याची माहिती असताना देखील पोलिसांकडून हातभट्टी विक्रेत्यांवर, हातभट्टी तयार करणाऱ्यांवर सातत्याने कारवाई होताना दिसत नाही, हे विशेष.

पोलिसांना वारंवार विनवणी, तरीही...

गावातील अनेक तरुण हातभट्टीच्या आहारी जात असून, त्यांच्या कुटुंबात सतत भांडणे सुरू असतात. या पार्श्वभूमीवर गावातील महिलांनी, गावकऱ्यांनी सोलापूर तालुका पोलिसांना वारंवार निवेदने दिली, गावातील हातभट्टी दारू विक्री बंद करण्याची विनंतीही केली. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींना विवाहितांनी दारूबंदीसाठी निवेदने दिली. आमदारांनी पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून दारूबंदीसाठी कारवाया करण्याच्या सूचनाही केल्या. मात्र, अधूनमधून कारवाई होते आणि गावागावांतील स्थिती ‘जैसे-थे’च आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com