'दहशतवादी हल्ल्यात अधिकाऱ्यांना वाचवू शकलो नाही'

मंगेश सौंदाळकर - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 31 जानेवारी 2017

मुंबई - मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात वेळेत पोलिस कुमक पाठवूनही तीन अधिकाऱ्यांना वाचवू शकलो नाही, अशी खंत माजी मुंबई पोलिस आयुक्त व गृहरक्षक दलाचे महासंचालक राकेश मारिया यांनी व्यक्त केली. ते मंगळवारी (ता.31) सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांनी "सकाळ'शी संवाद साधला. पोलिस सेवेतील 36 वर्षांत केलेले काम मारिया पुस्तकरूपात जगासमोर आणणार आहेत. गरजू खेळाडूंच्या विकासाकरता प्रयत्न करणार, असेही त्यांनी सांगितले. 

मारिया 1981 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यावेळी ते पोलिस नियंत्रण कक्षात होते. ""हल्ला झाल्याची माहिती कळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले. अधिकारी वेळेत पोचले होते. मात्र, हल्ल्यात तीन पोलिस अधिकाऱ्यांना वाचवू शकलो नाही, याची खंत कायम मनात राहील. त्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे नेमके काय सुरू आहे, हे समजू शकत नव्हते. अधिकाऱ्यांसोबत वायरलेसवरच संवाद होत होता,'' असे मारिया यांनी सांगितले. मारिया यांच्याकडे 1984 पासूनच्या केस डायऱ्या आहेत. त्याआधारे निवृत्तीनंतर पुस्तक लिहिणार आहेत. गुन्ह्यांची पार्श्‍वभूमी, न्यायालयातील अनुभव, तपासातील अडचणी आदी पुस्तकात असतील, अशी माहिती त्यांनी दिली. 
मुंबई पोलिसांसमोर यापुढे अनेक आव्हाने असतील. त्याकरता पोलिसांना खबऱ्यांचे जाळे वाढवणे आवश्‍यक आहे. गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथकात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे हे जाळे आवश्‍यक आहे. कित्येकदा खबऱ्यांचे जाळे तयार होईपर्यंत अधिकाऱ्यांचा कार्यकाल पूर्ण झालेला असतो. जे अधिकारी चांगले काम करताहेत, त्यांच्या कार्यकालात वाढ व्हावी, असाही प्रस्ताव मारिया यांनी राज्य सरकारकडे दिला होता. 

खेळाडूंसाठी प्रयत्न करणार 
मारिया उत्तम बास्केटबॉलपटू आहेत. निवृत्तीनंतर ते खेळाच्या विकासाकरता खास प्रयत्न करणार आहेत. चांगले खेळाडू निर्माण करू शकू, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Terrorist attacks could not save the officers