Shivsena: 'हीच शिंदे गटाची लायकी, भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde & dcm devendra fadnavis

Shivsena: 'हीच शिंदे गटाची लायकी, भाजपाने फेकलेले तुकडे तोंडात घेऊन...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका

आगामी विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपा २४० जागा लढवेल आणि शिंदे गटाच्या वाट्याला ४८ जागा येतील असं वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, संजय राऊत यांनीही यावरून शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

“हीच शिंदे गटाची लायकी आहे. ज्या शिवसेनेने २०१४ मध्ये एका जागेसाठी युती तोडली होती, ती स्वाभिमानासाठी तोडली होती. आता यांच्यासमोर ४०-४५ जागांचे तुकडे फेकले जात आहेत. यांच्यासमोर आयुष्यभर तुकडेच फेकले जातील आणि हेच तुकडे तोंडात ठेऊनच त्यांना जगावं लागेल, यांच्यात कोणताही स्वाभिमान नाही. राज्याचा भाजपाचा प्रदेशाध्यक्ष सांगतो, तुम्हाला ४० जागा देऊ, २५ जागा देऊ उद्या ते यांना पाच जागा सुद्धा देतील. हीच त्यांची लायकी आहे. त्यामुळेच भाजपाने शिवसेना तोडली. त्यांना या महाराष्ट्रात शिवसेनेचा दरारा संपवायचा होता” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

तर आगामी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा 240 जागा लढवण्याच्या तयारीत असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. ते भाजपा महाराष्ट्र सोशल मीडिया अभ्यास्वर्गाला संबोधित करत होते. यावेळी बावनकुळे यांनी सर्वांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. भाजपने 240 जागा लढवण्याची तयारी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फक्त 48 जागा येणार आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता यावर शिंदे गटाच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 50 हून अधिक जागांसाठी चांगले उमेदवार नाहीत, असंही यावेळी बावनकुळे म्हणालेत. भाजप शिंदे गटाव्यतिरिक्त असलेले मित्रपक्ष आणि अपक्षांनाही काही जागा सोडणार आहेत. शिंदे गटाचे सध्या 40 आमदार असून काही अपक्ष आमदारही त्यांच्याबरोबर आहेत.

यावेळी बोलताना बावनकुळे म्हणाले कि, विधानसभेत भाजपचे सध्या 105 सदस्य आहेत. तसेच आठ अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे. 60 मतदारसंघ असे आहेत की, त्यात भाजपची काही वेळ हार झाली आहे किंवा विजय झाला आहे. असे धरुन या जागांची संख्या 173 होते. त्यापैकी शिंदे गटाकडे असलेले 12 मतदारसंघ सोडले तरी अन्य मतदारसंघात भाजपला जिंकण्यासाठी आणखी 8 टक्के मते हवी आहेत.

तर भाजपकडे 43 टक्के मते असून आपल्याला 51 टक्के मते मिळवायची आहेत. रात्रंदिवस काम करून निवडणुकीच्या तयारीला लागावे. डिसेंबर 2023 पासून तुम्हाला रात्रंदिवस काम करावे लागेल. त्यासाठी आताच तयारीला लागा असं बावनकुळे यांनी म्हंटलं आहे.