वसंत डावखरे यांच्यावर ठाण्यात अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 जानेवारी 2018

ठाणे - विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

ठाणे - विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ठाण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सर्व पक्षांतील नेते आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. 

राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारा माणूस, अशी ओळख असलेले डावखरे दोन महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते. गुरुवारी (ता.4) रात्री मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले होते. डावखरे यांचे पार्थिव सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी आणण्यात आले. अंत्यसंस्काराच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आदी उपस्थित होते. 

माझे विश्‍वासू सहकारी असलेले वसंत डावखरे यांनी शिरूरसारख्या ग्रामीण भागातून येऊन ठाण्यासारख्या मोठ्या शहरात सार्वजनिक जीवनात ठसा उमटविला. त्यांनी महापौरपदाचा मानही मिळविला. त्यांचे राजकारण पक्षातीत होते. विधिमंडळात आल्यानंतर उपसभापती म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. त्यांनी निःपक्षपातीपणे काम केले. ते सर्वांमध्ये लोकप्रिय होते. 
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस 

विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या निधनाने राजकारणापलीकडे ऋणानुबंध जपणारा उमदा नेता आपण गमावला आहे. प्रदीर्घ काळ विधान परिषदेचे उपसभापतिपद भूषविताना त्यांनी सर्व पक्षांतील नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध राखले. राजकारण-समाजकारणासह कला, क्रीडा, शिक्षण आणि संस्कृती आदी क्षेत्रांत त्यांचा समर्थ वावर होता. राजकारणातील ज्येष्ठ नेत्यांसोबतच सर्व स्तरांतील मोठा लोकसंग्रह हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

वसंत डावखरे यांच्या निधनाने अजातशत्रू नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. ठाणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी सलग 18 वर्षे एवढा प्रदीर्घ काळ विधान परिषदेचे उपसभापती म्हणून काम पाहिले. सर्वांना सोबत घेऊन सत्ताधारी व विरोधी पक्षांतील संवाद कायम ठेवत संसदीय कामकाजाला नवी उंची प्राप्त करून दिली. 
- अशोक चव्हाण, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष 

राजकारणात राहूनही मनाचा उमदेपणा कसा जपावा आणि सर्वपक्षीय मैत्री कशी जपावी, याचे वसंत डावखरे हे उत्तम उदाहरण होते. मैत्री आणि विकासाच्या आड त्यांनी कधीही राजकारण येऊ दिले नाही. ठाण्याच्या विकासातील त्यांचे योगदान नागरिक विसरणार नाहीत, त्यांनी भूषविलेले विधान परिषदेचे उपसभापतिपद हा ठाणेकरांचाही गौरव होता. 
- एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) 

Web Title: thane news vasant davkhare Funeral in Thane