ठाणे जलवाहतूक लवकरच - मुख्यमंत्री 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 6 एप्रिल 2017

मुंबई - ठाणे- मीरा भाईंदर शहरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी शहरातून ठाणे व वसई या खाडीचा वापर जलवाहतुकीसाठी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड आणि ठाणे महानगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन ठाणे जलवाहतूक व्यवस्था लवकरच सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. 

या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, की केंद्र सरकारच्या "द नॅशनल वॉटर वे'नुसार महाराष्ट्रात 14 मार्ग हे राष्ट्रीय (नॅशनल वॉटर वे) जलवाहतूक मार्ग घोषित केलेले असून, सात मार्ग खाड्यांच्या कक्षेत आहेत, तर सात मार्ग नदींमध्ये आहेत. ठाणे खाडीतील जलमार्ग हा राष्ट्रीय जलवाहतूक मार्ग एन.डब्ल्यू.- 53 असून त्याची लांबी 145 कि.मी. आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. सदर निविदेस प्रतिसाद न मिळाल्याने तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या. सध्या निविदा मंजुरी टप्प्यात आहे. "सागरमाला'अंतर्गत मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून प्रत्यक्ष कामास सुरवात करण्यात येईल. या कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डला सक्षम अधिकारी नेमण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

फडणवीस म्हणाले, की कल्याण- ठाणे- कोलशेत- गायमुख- भाईंदर- वसई अशी प्रवासी जलवाहतूक करता येणार आहे. सध्या कल्याण, वसई, मीराभाईंदर, घोडबंदर रोड, भिवंडी, कोलशेत, दिवा, ठाणे येथे जेटी बांधून प्रवासी जलवाहतूक करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे गोराई, बोरिवली, वसई व भाईंदर रो-रो वाहतूक प्रस्तावित असून, त्यास केंद्र सरकारची सागरमाला योजनेंतर्गत मान्यता मिळाली आहे. या चर्चेत सदस्य संजय केळकर, राज पुरोहित, मंदा म्हात्रे यांनी सहभाग घेतला. 

Web Title: Thane Shipping soon - CM