खासदारकीला पराभूत उमेदवारास आमदारकीची लढाई खूप कठीण! राजकीय समीकरणे बदलली; आमदारकीसाठी इच्छुकांकडून शब्द घेऊनच लोकसभा निवडणुकीत मदत

माळशिरसचे आमदार राम सातपुते व ‘शहर मध्य’च्या आमदार प्रणिती शिंदे हे दोघे सोलापूर लोकसभा लढवत आहेत. पण खासदारकीच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराचा पराभव होईल, त्यांच्यासाठी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणूक त्यांच्याच मतदारसंघात अधिक कठीण असणार आहे.
maharashtra-vidhansabha
maharashtra-vidhansabhasakal

सोलापूर : माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम सातपुते व ‘शहर मध्य’च्या आमदार प्रणिती शिंदे हे दोघे सध्या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पण, खासदारकीच्या निवडणुकीत ज्या उमेदवाराचा पराभव होईल, त्यांच्यासाठी ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभेची निवडणूक त्यांच्याच मतदारसंघात लोकसभेच्या तुलनेत अधिक कठीण असणार आहे हे निश्चित.

माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव असून त्याठिकाणी मोहिते-पाटलांच्या मदतीने २०१९च्या निवडणुकीत राम सातपुते पहिल्यांदाच आमदार झाले. पण, आता लोकसभा निवडणुकीत त्याठिकाणची राजकीय स्थिती बदलली आहे. मोहिते-पाटलांनी बंड करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मिळवली आहे. या निवडणुकीत उत्तमराव जानकर यांनी माळशिरससह मतदारसंघातील इतर तालुक्यांमधून धनगर समाजाचे मताधिक्य धैर्यशील मोहिते-पाटलांना देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे याच वर्षी होणाऱ्या विधानसभा मतदारसंघात आगामी काळात भाजपला आमदारकीसाठी ताण काढावा लागणार आहे. दुसरीकडे शहर मध्य या विधानसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे यांना मागील २०१४ व २०१९ च्या निवडणुकांमध्ये विजयासाठी ताण काढावा लागला होता. त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधली, पण आगामी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातील राजकीय गणिते बदललेली दिसतील अशी सद्य:स्थिती आहे.

माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी या मतदारसंघावर इंडिया आघाडी म्हणून दावा केला आहे. दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देखील या ठिकाणी इच्छुक असतील. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत ज्या उमेदवाराचा पराभव होईल, त्यास आमदारकीसाठी मोठा संघर्ष करावा लागेल, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे.

निवडणूक लोकसभेची अन्‌ बांधणी विधानसभेची

सोलापूर असो की माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चुरशीने होत आहे. २०१४ व २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत आताच्या निवडणुकीत मदत करण्यासाठी आमदारकीस इच्छुकांनी आताच नेत्यांकडून शब्द घेतला आहे. जिल्ह्यातील करमाळा, सांगोला, माढा, माळशिरस या विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी आतापासूनच ‘आमचं ठरलंय म्हणत माढा लोकसभेसाठी मदत करायला सुरवात केली आहे. सोलापूर लोकसभेतील शहर मध्य, शहर उत्तर, दक्षिण सोलापूर, मोहोळ व पंढरपूर- मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघात देखील अशीच स्थिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com