गुणांच्या टक्केवारीची स्पर्धा जीवघेणी! मुलांना आता संस्काराची गरज; संस्कारामुळे वाढते निर्णयक्षमता अन्‌ वाढतो आत्मविश्वास; मोबाईलशी नव्हे पुस्तकांशी हवी मैत्री

मुलगा अजून दोन-चार वर्षांचाच असतो, त्याचवेळी पालक आपला मुलगा शिकून डॉक्टर, पायलट, मोठा अधिकारी व्हावा अशी अपेक्षा करतात. अशावेळी संस्कारापेक्षा शाळेतील गुणांच्या टक्केवारीलाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यातूनच पुढे मुलांना नैराश्य येते.
मुलांना घडवणं सोप्प नक्कीच नसतं
मुलांना घडवणं सोप्प नक्कीच नसतंesakal

सोलापूर : मुलगा अजून दोन-चार वर्षांचाच असतो, त्याचवेळी पालक आपला मुलगा शिकून डॉक्टर, पायलट, मोठा अधिकारी व्हावा अशी अपेक्षा करतात. अशावेळी संस्कारापेक्षा शाळेतील गुणांच्या टक्केवारीलाच सर्वाधिक महत्त्व दिले जाते. त्यातूनच पुढे मुलांना नैराश्य येते. त्यामुळे पालकांनी विशेषत: आईने मुलांकडे लक्ष द्यायला हवे. शाळांनीही ग्रंथालयातील पुस्तके मुलांना उपलब्ध करून देणे, मनोरंजनात्मक स्पर्धा व विविध उपक्रमांवर भर देऊन कृतीयुक्त शिक्षण देणे काळाची गरज आहे. शालेय जीवनात गुणांच्या टक्केवारीपेक्षा संस्कारालाच प्राधान्य हवे, असे तज्ज्ञ सांगतात.

कोरोना काळात मुलांचा शारीरिक व्यायाम कमी झाला. मोबाईलचा अतिवापर वाढल्याने अनेकांना दृष्टीदोषाची समस्या उद्‌भवली. शाळा बंद राहिल्याने अनेक मुलांचे मित्र टीव्ही, मोबाईल झाल्याची वस्तुस्थिती आहे. अशावेळी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक मुलांसाठी खूपच प्रेरणादायी ठरेल. शालेय जीवनात विद्यार्थ्यांची जडणघडण होताना त्याला सर्वप्रथम संस्काराची गरज असते. वाचनाची गोडी, मनोरंजनात्मक स्पर्धांमधून शिक्षण, स्वावलंबी जीवन, सामाजिक एकात्मता अशा विविध बाबींवर साने गुरुजींनी भर दिला होता. ७३ वर्षानंतरही समजाला साने गुरुजींच्या विचारांची गरज निर्माण झाली आहे. प्रत्येक पालकांनी साने गुरुजींच्या विचारांचा अंगीकार केल्यास निश्चितपणे मुलांची योग्य दिशेने वाटचाल राहील, असा विश्वास शिक्षणतज्ज्ञांना आहे.

‘श्यामची आई’ ५१ पुस्तके विद्यार्थांना भेट

हंजगी (ता. अक्कलकोट) येथील वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळेत साने गुरुजींच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ ५१ पुस्तके विद्यार्थांना भेट दिली. या पुस्तकामुळे विद्यार्थ्यावर वाचन संस्कार होऊन व्यक्तीच्या समाज आणि राष्ट्र विकासाला चालना मिळण्यास मदत होत आहे. वाचन व संस्काराला प्रोत्साहन मिळावे, यासाठी साने गुरुजी तालुका शाखेच्या वतीने पुस्तके वाटप केली.

- परमेश्वर व्हसुरे, शाखाप्रमुख, साने गुरुजी तालुका शाखा

शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हवे ग्रंथालय

जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांसह खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची गरज आहे. काही शाळांमध्ये पुस्तकांचा संग्रह आहे, पण विद्यार्थ्यांना पुस्तके दिली जात नाहीत. चिमुकल्यांना बालपणापासून वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी प्रत्येक शाळांनी त्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. साने गुरुजींनी वाचन संस्कृती रुजावी, वाढावी यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांच्या पावलावर पाऊल सर्वच शिक्षकांनी टाकायला हवे, असे शिक्षणतज्ज्ञांचे मत आहे.

शिक्षणासोबतच मुलांना द्यावेत संस्काराचे धडे

सध्या शाळा- महाविद्यालयांमध्ये संस्कारापेक्षाही गुणांच्या टक्केवारीलाच प्राधान्य दिले जात असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच शासनाला शाळांमध्ये आजी- आजोबा दिवस साजरा करावा, असा निर्णय घ्यावा लागला. मूल्यशिक्षण, शारीरिक शिक्षण हे विषय फक्त नावालाच आहेत. परंतु, सद्य:स्थितीत मुलांना शिक्षणासोबतच संस्काराचे धडे देण्याची फार मोठी गरज निर्माण झाली असून त्यातून मैत्री, संघभावना, मदत अशा बाबींचे आकलन विद्यार्थ्यांना बालवयात होण्यास मदत होणार आहे.

वाचनाची गोडी, संस्कार वर्ग ही काळाची गरज

गुणांच्या टक्केवारीसोबतच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना संस्कार द्यायलाच हवेत. संस्कारातून मुलांचा आत्मविश्वास, निर्णयक्षमता वाढते आणि मनावर त्याचा ताबा राहतो. त्यामुळे भविष्यात मुलगा नैराश्यग्रस्त होणार नाही. वाचनाची गोडी, संस्कार वर्ग ही काळाची गरज असून त्यासाठी पालकांनी मुलांना वेळ द्यावा.

- डॉ. वीणा जावळे, प्राचार्य, डॉ. शेठ गोविंदजी रावजी आयुर्वेद महाविद्यालय, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com