esakal | पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या हातात! आणखी काही दिवस प्रतीक्षाच | Passanger Train News
sakal

बोलून बातमी शोधा

पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या हातात!

राज्य सरकारने परवानगी दिल्यास पॅसेंजर गाड्या सुरू होतील, अशी माहिती रेल्वेच्या विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या हातात!

sakal_logo
By
विजय थोरात

सोलापूर : कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर हळूहळू रेल्वेची (Train) प्रवासी वाहतूक सेवा रुळावर येत आहे. रेल्वे प्रशासनाने (Railway Administration) विशेष एक्‍स्प्रेस सुरू केलेल्या आहेत. मात्र सर्वसामान्यांसह चाकरमान्यांसाठी स्वस्तात प्रवास करता येणाऱ्या पॅसेंजर गाड्या (Passanger Trains) अजूनही सुरू झाल्या नाहीत. मागील दीड वर्षापासून एकही पॅसेंजर गाडी धावली नाही. राज्य सरकारने परवानगी दिल्यास पॅसेंजर गाड्या सुरू होतील, अशी माहिती रेल्वेच्या विश्‍वसनीय सूत्रांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

सोलापूर विभागातून सध्या विशेष एक्‍स्प्रेस गाड्या धावत आहेत. मात्र या गाड्यांतून सर्वसामान्यांसह विद्यार्थी, व्यापारी, शेतकरी, चाकरमान्यांना प्रवास करणे परवडत नसल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्‍त केल्या. विभागातून सध्या दररोज 50 विशेष एक्‍स्प्रेस धावत आहेत. याचे तिकीट दर देखील जास्त आहे. विशेष एक्‍स्प्रेसचा फायदा हा आंतरराज्य व लांब पल्ल्यापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. मात्र स्थानिक प्रवाशांना खासगी आणि एसटी बसचा आधार घ्यावा लागत आहे.

हेही वाचा: 'हळद एकाबरोबर आणि लग्न दुसऱ्याबरोबर अशी भूमिका शिवसेनेची!'

सोलापूर रेल्वे प्रशासनाकडून कोणत्या पॅसेंजर सुरू करता येतील, याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडे पाठविण्यात आली आहे. मात्र पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने पुणे, गुलबर्गा, दौंड, पंढरपूर या मार्गावरील हजारो प्रवासी पॅसेंजरचा आधार घेतात. या सर्वांची कोंडी होत आहे. लॉकडाउन शिथिल झाल्याने शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक संस्थांचे कामकाज सुरू झाले आहे. त्यासाठी एसटीचा आणि खासगी वाहनांचा महागडा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित सोलापूर विभागातून धावणाऱ्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून व्यक्‍त केली जात आहे.

सोलापूर रेल्वे स्थानकावरून प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पॅसेंजर गाड्या सुरू होणे अपेक्षित आहे. यामध्ये सोलापूर - पुणे, कोल्हापूर - विजयपूर, सोलापूर - हैदराबाद, गुलबर्गा - सोलापूर, सोलापूर - फलकनुमा या पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या वेळेची आणि पैशाची बचत व्हावी यासाठी रेल्वे प्रशासनाने गाड्या सुरू करण्याची आवश्‍यकता आहे.

हेही वाचा: MPSC ची ना वाढली वयोमर्यादा ना निघाली 15 हजारांची भरती !

वेळोवेळी प्रवासी संघटनांकडून मागणी करण्यात आली आहे. सोलापूरच्या खासदारांनी देखील सोलापूर - मिरज एक्‍स्प्रेससह अन्य गाड्या सुरू करण्याबाबात निवेदन द्यावे, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

- संजय पाटील, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ, सोलापूर

पॅसेंजर गाड्या सुरू करण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. सोलापूर विभागांकडून गाड्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव पाठविला आहे. ज्या वेळी पॅसेंजर गाड्या सुरू करण्याच्या सूचना वरिष्ठ स्तरावरून येतील तेव्हा गाड्या पूर्ववत होतील.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर

loading image
go to top